इंदिरा गांधींनी सावरकरांचे केले होते समर्थन; भाजपच्या स्वामींनी शेअऱ केलं पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

subramanian swamy

सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी निशाणा साधला आहे.

'इंदिरा गांधींकडून सावरकरांच्या समर्थनावर काँग्रेसचे काय म्हणणे?'

काँग्रेससह अनेक पक्षांचे नेते सावरकरांवर सातत्यानं टीका करतात. आता सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी एका जुन्या पत्राचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सुब्रमण्यम स्वामी यांनी विचारलं आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंदिरा गांधींनी दिलेल्या या समर्थनावर काँग्रेसचे काय म्हणणे आहे?

सुब्रमण्यम स्वामी यांनी १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लिहिलेल्या एका पत्राचा फोटो ट्विट केला आहे. हे पत्र इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे तत्कालिन सचिव पंडित बाखले यांना २० मे १९८० रोजी पाठवलं होतं. यामध्ये सावरकरांची जन्मशताब्दीसुद्धा साजरी करण्यात यावी असा उल्लेख आहे.

पंडित बाखले यांना लिहिलेल्या पत्रात इंदिरा गांधी यांनी म्हटलं होतं की, मला तुमचं ८ मे १९८० रोजी पत्र मिळाले. आपल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनातील इतिहासात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याचं वेगळं महत्त्व आहे. भारताच्या या सुपूत्राची जन्मशताब्दी साजरी करण्याची योजना यशस्वी व्हावी अशी प्रार्थना करते.

इंदिरा गांधी यांनी पाठवलेल्या या पत्राचा फोटो शेअर करत सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसला प्रश्न विचारला आहे. इंदिरा गांधींनी सावरकरांच्या केलेल्या समर्थनावर काँग्रेस काय म्हणणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस नेत्यांनी अनेकदा सावरकरांबाबत वक्तव्ये केली आहेत. सावरकरांनी इंग्रजांकडे दयेचा अर्ज केल्याचं आणि माफी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर आता पुन्हा चर्चा होत आहे. राजनाथ सिंह म्हणाले होते की, सावरकर यांच्याविरोधात खोटं पसरवलं गेलं की, त्यांनी दयेचा अर्ज दिला. मात्र सत्य हे आहे की, महात्मा गांधींनी त्यांना दयेचा अर्ज दाखल कऱण्यास सांगितलं होतं. गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी अर्ज दाखल केला होता. तसंच सावरकरांच्या सुटकेसाठी गांधीजींनी प्रयत्न केले होते असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं.

loading image
go to top