हुतात्मा जवानाच्या पत्नीला दिले घर बांधून, बघा गृहप्रवेशाचा अनोखा व्हिडिओ

वृत्तसंस्था
रविवार, 18 ऑगस्ट 2019

या जवानाच्या कुटुंबीयांना घर बांधण्यासाठी तरुणांनी लोकांकडून पैसे गोळा करत 11 लाखांची रक्कम जमा केली होती. सीमा सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) जवान मोहन सिंग 27 वर्षांपुर्वी आसाममध्ये हुतात्मा झाले होते.

इन्दूर : मध्य प्रदेशातील बेटमा गावात हुतात्मा जवानाच्या पत्नीला गावकऱ्यांनी घर बांधून दिले मात्र त्यानंतर गावकऱ्यांनी आपल्या हाताच्या पायऱ्या करून या जवानाच्या पत्नीचा गृहप्रवेश केल्याने सोशल मीडियावर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या जवानाच्या कुटुंबीयांना घर बांधण्यासाठी तरुणांनी लोकांकडून पैसे गोळा करत 11 लाखांची रक्कम जमा केली होती. सीमा सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) जवान मोहन सिंग 27 वर्षांपुर्वी आसाममध्ये हुतात्मा झाले होते. तेव्हापासून त्यांची पत्नी आणि इतर कुटुंब एका जुन्या झोपडीत राहत होते. मोहन सिंग यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे खूप हाल झाले होते. त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणीदेखील उभ्या राहिल्या होत्या. 

त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून गावकऱ्यांनी त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आणि तो तडीसही नेला. तरुणांनी ‘वन चेक-वन साइन’ या नावाने एक मोहिम सुरु करत आर्थिक मदत उभारली. गृहप्रवेशावेळी तरुणांनी हातघड्या पसरल्या होत्या. त्यावरून चालत जात या जवानाच्या पत्नीने गृहप्रवेश केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indore youths collect Rs 11 lakh gift new house to wife of martyred soldier