
महागाईने मोडलं सामान्यांचं कंबरडं; गाठला आठ वर्षातला उच्चांक
नवी दिल्ली : खाद्यतेल आणि इंधन दरातील वाढीमुळे देशातील किरकोळ महागाई दराने एप्रिलमध्ये गेल्या आठ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. सरकारने आजच जाहीर केलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये ६.९५ टक्के असलेल्या महागाईचा एप्रिलमध्ये ७.७९ टक्के इतका भडका उडाला आहे. ही वाढ एक टक्के इतकी दाखविली जात असली तरी किरकोळ बाजारपेठेच्या हिशेबांनुसार सर्वसामान्यांवरील त्याचा बोजा प्रचंड असणार आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.
पेट्रोल, खाद्यपदार्थ आणि गॅसचे दरही वारंवार वाढत असून त्याचा परिणाम दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचे दरही चढे होण्यात होत आहे. सर्वसामान्यांना जगण्यासाठी आवश्यक त्या वस्तूंचा भडका उडविणारा महागाईचा आलेख सातत्याने वाढत असून सरकारी आकडेवारीनुसार मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये किरकोळ महागाईमध्ये एक टक्का वाढ झाली आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला किरकोळ बाजारातील महागाई दर २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे आदेश दिले त्यानंतर ही नवी आकडेवारी आली आहे. यानुसार ग्राहक मूल्य निर्देशांकाच्याजवळपास निम्मी असलेली अन्नधान्य महागाई एकट्या एप्रिलमध्ये प्रचंड वाढल्याने हा निर्देशांत उच्चांकावर पोहोचला आहे. भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीतही झपाट्याने वाढ झाल्यामुळे त्या आता आणखी वाढण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
रिझर्व्ह बँकेने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या आठवड्यात अचानक दोन महिन्यांच्या नियमित वेळेआधीच रेपो दर ४ टक्क्यांवरून ४.४० टक्के केला होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी तेव्हा स्पष्ट केले होते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये महागाई दर आधी अंदाजित केलेल्या ५.३ ते ५.५ टक्क्यांवरून सहा टक्के करत असल्याचे निर्मल बंग कंपनीच्या अर्थतज्ज्ञ टेरेसा जॉन यांनी म्हटले आहे.
सर्वांचे अंदाज चुकविले
ग्राहक किंमत निर्देशांक दर एप्रिलमध्ये मार्चमधील ६.९५ टक्क्यांवरून आणि एप्रिल २०२१ मधील ४.२३ टक्क्यांवरून ७.५० टक्क्यांवर जाईल, असा अंदाज विश्लेषकांनी वर्तवला होता. मात्र सगळ्यांचे अंदाज चुकवत महागाई दराने धक्का दिला आहे. सलग चार महिने हा दर रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्के या कमाल पातळीपेक्षा अधिक राहिला आहे. मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये १.९६ टक्क्यांवर असलेली महागाईची टक्केवारी मागच्या महिन्यात मात्र ७.६८ टक्के झाली होती.
Web Title: Inflation Rate Is Highest In India During May Month Of 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..