esakal | "पंतप्रधान निवास बांधण्यापेक्षा, लोकांचा जीव वाचवण्यासाठी पैसे खर्च करा"

बोलून बातमी शोधा

narendra modi
"नवं पंतप्रधान निवास बांधण्यापेक्षा, लोकांचा जीव वाचवा"
sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली PMs new house- कोरोनो महामारीचा प्रकोप सुरु असताना दिल्लीत पंतप्रधान निवासाचे काम वेगात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी Priyanka Gandhi यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोनाचा हाहाकार सुरु असताना लोकांचा जीव वाचवणे सर्वात महत्त्वाचे आहे. अशावेळी केंद्र सरकारने आपली संसाधने आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी वापरायली हवीत. देशात ऑक्सिजन, लस आणि हॉस्पिटल बेड्सची कमतरता आहे. यामध्ये वाढ करण्यासाठी सरकारने पैशांचा वापर करायला हवा, असं प्रियांका म्हणाल्या आहेत. (Instead of spending cr on PMs new house Centre focus should be Covid relief Priyanka Gandhi)

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दुसरी लाट जास्त भयंकर असून अनेकांचा मृत्यू होत आहे. ऑक्सिजनअभावी तडफडून लोक जीव सोडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशात प्रियांका गांधी यांनी आज सकाळी ट्विट केलंय. देशात लोक ऑक्सिजनचा पुरवठा, लस, ऑक्सिजन बेड्स, औषधे मिळवण्यासाठी झगडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पंतप्रधान निवास बनवण्यासाठी १३,००० कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा, आपली सर्व ताकद लोकांचे जीव वाचवण्यासाठी वापरायला हवी, असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

सेंट्रल विस्टाचा एक भाग असलेल्या पंतप्रधान निवासाच्या बांधकामाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. बांधकामाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आला असून २०२२ पर्यंत निर्माण पूर्ण करण्याचे निर्धारित आहे. यासाठी एकूण १३,४५० कोटी रुपये लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा संदर्भ देत प्रियांका गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसने कोरोना काळात सुरु असणाऱ्या सेंट्रल विस्टाच्या बांधकामावर वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा: कोरोनाच्या हाहाकारात नव्या पंतप्रधान निवासाचं काम सुरु राहणार; सरकारची परवानगी

प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारच्या कोरोना हाताळणीवरुन यापूर्वीही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर यावं आणि सांगाव की ते कशापद्धतीने लोकांचे प्राण वाचवणार आहेत. जगातील सर्वाधिक ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या देशाला आज त्याचा तुटवडा का जाणवत आहे, असा सवालही त्यांनी सरकारला केलाय. राहुल गांधींनी नुकतंच देशात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिलाय.