#Jaganelive भंगार वेचून ‘त्या’ शिवताहेत फाटका संसार !

संजय सूर्यवंशी
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

जगणं लाईव्‍ह!
प्रत्येक बातमीच्या मागे असते एक कहाणी. सुख-दु:खाच्या या ‘लाईव्ह’ कहाण्या शोधून आमच्या बातमीदारांनी यंदाच्या दिवाळी विशेषांकात ‘रिपोर्ताज’ स्वरूपात सविस्तर मांडल्यात. दिवाळी अंक तुमच्या हातात पडण्यापूर्वी रोजच्या अंकात बातम्यांच्या रूपात या कहाण्यांचे ‘ट्रेलर’ आम्ही देणार आहोत. अर्थात खरी मेजवानी मिळेल, ‘सकाळ दिवाळी २०१८’च्या विशेषांकात...

कितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला! पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या अशा सुमारे ४०० महिला बेळगावातील ज्योतीनगरमध्ये राहतात. त्यांचं जगणंच रोजच्या भंगाराशी बांधलं आहे. पहाटे चार वाजता उठणं, दिवसभर कष्ट करणं आणि संध्याकाळी चारच्या आत घरात येणं हे त्यांचं जीवनचक्र बनलं आहे. ते अव्याहतपणे फिरतंच आहे.

‘‘भाऊ, आमचं घर या मोडक्‍या बाजारावर चालतं बगा... न चुकता पहाटे सव्वाचार वाजता घरातून बाहेर पडायचं... काचा, बाटल्या, भंगाराचं लोखंड, मिळंल ते दिवसभर गोळा करायचं... संध्याकाळी शे-दीडशे रुपये घेऊन घराकडं यायचं... ३५ वर्सं हा नेम काय चुकला नाही बगा... भंगार गोळा करणं हेच आमच्या नशिबी हाय...’’ बेळगावातल्या रेखा मोहन खोरागडे या भंगार गोळा करणाऱ्या डोंबारी समाजातील महिलेनं ‘सकाळ’सोबत बोलताना मांडलेली ही व्यथा तिच्यासारख्या शेकडो महिलांची व्यथा सांगणारी आहे.

बेळगावच्या पश्‍चिमेला असलेल्या ज्योतीनगर परिसरात या डोंबारी समाजाची सुमारे ४०० घरं आहेत. या वस्तीतले पुरुष जातात मिळेल ते मोलमजुरीला आणि महिला भंगार वेचण्याच्या कामाला. प्लास्टिकच्या बाटल्या, पुठ्ठे, लोखंड, प्लास्टिक, 

कागदे जे काही मिळेल ते घेऊन या महिला शहरातील ३० ते ३५ भंगार अड्ड्यांवर जाऊन विकतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचं घर चालतं. 

पहाटे चारच्या दरम्यान भंगार गोळा करायला बाहेर पडलेल्या सुमारे ४०० महिला संध्याकाळी चारच्या आत घरात येतात. चारच्या आत घरी येणं हा एक अलिखित नियमच आहे. त्याचं ऐतिहासिक कारण सांगताना निवृत्त शिक्षक भिकाजी धनाजी भोसले म्हणाले, ‘‘शिवरायांच्या काळात डोंबारी समाजात सर्जा अन्‌ कस्तुरा हे शूर जोडपं होतं. अर्जुन गडाचा गडकरी अहंमद खान याने कस्तुरा डोंबारणीचा खेळ पाहिला अन्‌ त्याने तिला पळवूनच नेण्याचा प्रयत्न केला; परंतु कस्तुरा त्याच्या तावडीतून सुटून आली. तेव्हापासून डोंबारी महिला सूर्यास्तापूर्वी म्हणजे चारच्या आत घरात परततात. त्यातूनही एखादी महिला वेळेत घरी आली नाही, तर तिला समाजाबाहेर काढण्याचा अधिकार आजही आहे. अलीकडे शिकलेल्या मुली या रूढींना फारसे महत्त्व देत नाहीत.’’ 

सोळाव्या शतकातील या लढवय्या समाजाला इंग्रजांनी गुन्हेगार ठरवले. तेव्हाचा शिक्का पुसणे त्यांना अजूही अवघड जात आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीने याच समाजातील एका तरुणाला ताब्यात घेतले होते. नंतर तो निर्दोष निघाला! अर्धवट शिक्षण झालेले अनेक तरुण मोलमजुरीला, अंगमेहनतीच्या कामावर जातात. अर्थात त्यांच्या कुटुंबाला खरा आधार आहे तो भंगार वेचणाऱ्या महिलांचा. कारण त्यांना रोजचे ताजे पैसे मिळतात.

रोज घाणीत, कचऱ्यात काम करत असल्याने या महिला अंगदाह, डोकेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, दातदुखी आदी आजारांच्या तक्रारी करतात. रोटीबेटीसारखे व्यवहार जातपंचायतीच्या नियमाने चालायचे. आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांची मुले शिकू लागली आहेत. हे भंगार वेचण्याचे काम करायचे नाही, असा निश्‍चय करू लागली आहेत. अर्थात आम्हाला हातपाय चालत आहेत, तोपर्यंत हे काम करावेच लागणार आहे, असे या महिला बोलून दाखवत आहेत. या समाजातील काही मुले उच्चशिक्षित झाली आहेत. कष्ट, गरिबीचे हे चक्र भेदण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

नवी पहाट उगवते आहे...
डोंबारी समाजातील तरुण पिढीला आता गावकी स्वीकारत आहे. त्यांना ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष आदी पदे मिळत आहेत. बचतीची सवय लागावी म्हणून डोंबारी समाजासाठी सहकारी पतसंस्था स्थापन केली गेली आहे. या पतसंस्थेचा आर्थिक व्यवहारही चांगला आहे. तरुण-तरुणी शिकत आहेत. आधुनिक पेहराव परिधान करत आहेत.  नको असलेल्या जुन्या परंपरा झिडकारू पाहत आहेत.

पहाटे चार वाजता उठायचे, रिक्षा थांब्यावर यायचे अन्‌ येथून शहरात भंगार गोळा करण्यासाठी जायचे. ३५ वर्सं झाली, आपला नेम काय चुकला नाय... पोरं मोठी झाली... माझा राजेश आता ३५ वर्सांचा झालाय... कुठं झाडं तोडायला जा, सेंट्रिंगचं काम कर, असं करून तो जगतोय... पण आम्हाला जगायला भंगार गोळा करणं हेच नशिबी हाय... हातपाय चालतात... तोपर्यंत हे करत राहणार....
- श्रीमती रेखा खोरागडे,
भंगार वेचक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaganelive Kolhapur Sakal Diwali Article on scrap collecting women