
Jagdeep Dhankhar : राज्यसभेत समारोपालाही सभात्यागास्त्र !
नवी दिल्ली - राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे आज सभागृहात मोठा गदारोळ झाला. धनखड यांनी कॉंग्रेस आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या एका टिप्पणीवर नाराज होऊन धनखड यांनी, त्याबद्दल नाराजी व्यक्त करताच कॉंग्रेस सदस्य खवळले. संसदेच्या दोन्ही सभागृहांबाहेर केलेल्या टिप्पणीचा उल्लेख पीठासीन अधिकाऱयांनी करणे गैर व दुर्देवी आहे.
त्यामुळे तुमची ही टिप्पणी कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकावी असे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. त्याना सभापतींनी नकार देताच खर्गे यांच्यासह कॉंग्रेस व विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. राज्यसभेच्या अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी खुद्द सभापतींच्या टिप्पणीवरून व त्यांच्याच निषेधार्थ विरोधी पक्षांनी सभात्याग करण्याचा हा कदाचित पहिलाच प्रसंग मानला जात आहे.
सोनिया गांधी यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना सरकार ‘विशिष्ट पध्दतीने‘ न्यायपालिकेचा अनादर करत असल्याबाबत आरोप केला होता. धनखड यांनी राज्यसभा सभापती म्हणून सूत्रे स्वीकारताना पहिल्याच दिवशी न्यायव्यवस्थेवर जी प्रतीकूल टिप्पणी केली होती त्याचा संदर्भ श्रीमती गांधी यांच्या विधानाला असल्याचे मानले गेले. त्यामुळे धनखड संतप्त झाले व त्यांनी यूपीए अध्यक्षांच्या टिप्पणीवर राज्यसभेत आक्षेप घेतला.
धनखड यांनी केलेला हा प्रकार राज्यसभेच्या प्रथा व परंपरा यांना हरताळ फासण्याचा सरळसरळ प्रकार असल्याचे कॉंग्रेसच नव्हे तर बहुतांश विरोधी पक्षांचे मत आहे. द्रमुक, तेलंगणा राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, डावे पक्ष, शिवसेना, आप आदीचे सभागृहातही आज अनेक विरोधी पक्ष सदस्यांकडून मांडले गेले.
दुसऱया सभागृहात, किंवा राज्यसभेचे सदस्य नसलेल्या खासदारांनी काही टिप्पणी केली तर त्यावर राज्यसभेत चर्चा- टीकाटिप्पणी होत नाही ही या वरिष्ठ सभागृहाची परंपरा आहे. खर्गे म्हणाले की लोकसभेच्या सदस्याने बाहेर काही सांगितले तर राज्यसभेत त्यावर चर्चा होत नाही. आणि त्यावर जर सभापतीच भाष्य करत असतील तर ते अत्यंत दुर्दैवी आहे.
असे कधीही होत नाही. मी विनंती करतो की अध्यक्षांचे विधान कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकावे. द्रमुक नेते तिरूची सिवा व टीआरएस नेते केशव राव म्हणाले की सभागृहाबाहेर केलेल्या टिप्पण्यांवर सभागृहात भाष्य करणे योग्य नाही. मात्र सभापती आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. मी राज्यसभा सभापतीपदावर पक्षपाती भूमिकेचे आरोप कधीही होऊ देणार नाही.
धनकड म्हणाले की न्यायपालिकेला अवैध ठरवण्याच्या विषयावर मला ‘त्यांच्या‘कडून किंवा तुमच्याकडून ‘अनलिस्ट' केले जाऊ शकत नाही. न्यायपालिकेला अवैध ठरवण्याच्या व्यवस्थेचा मी एक भाग आहे असा आरोप माझ्यावर होणे याचा याचा अर्थ ही लोकशाहीसाठी मृत्यूची घंटा आहे का ? असेही त्यांनी संतप्तपणे सांगितले.
या मुद्द्यावर सरकारही धनखड यांच्या पाठीशी उभे राहिले. सभागृहनेते पीयूष गोयल म्हणाले की दुस-या सभागृहातील एका खासदारांनी राज्यसभा सभापती व उपराष्ट्रपतींसारख्य अतिउच्च पदावरील व्यक्तीबाबत या भाषेत नाराजी व्यक्त करणे दुर्दैवी आहे. उपराष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. (श्रीमती गांधी यांचे) ते विधान योग्य आहे का यावर विरोधी पक्षनेत्यांनी विचार करावा असे गोयल म्हणाले.