काश्‍मीरला लुटणाऱ्यांना गोळ्या घाला : राज्यपाल मलिक 

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

कोणत्याही समस्येचे उत्तर बंदुकीने मिळणार नाही, असे स्पष्टीकरणही लगेच मलिक यांनी दिले. यासाठी त्यांनी श्रीलंकेतील "एलटीटीई'च्या समस्येचेही उदाहरण दिले. "दहशतवाद्यांच्या बंदुकांपुढे भारत सरकार कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडावा, '' असे मलिक म्हणाले. 

श्रीनगर : "दहशतवाद्यांनी निरपराध नागरिक, सुरक्षा दलाचे जवान यांना गोळ्या घालण्याऐवजी काश्‍मीरला लुटणाऱ्यांना गोळ्या घालाव्यात,'' असे वादग्रस्त वक्तव्य जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज केले. 

"ज्या मुलांनी हातात बंदुका घेतल्या आहेत, ते आपल्याच माणसांना मारत आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांना मारत आहेत. तुम्ही त्यांना का गोळ्या घालत आहात? काश्‍मीरची संपत्ती लुटणाऱ्यांना गोळ्या घाला. जम्मू-काश्‍मीरला लुटणाऱ्या एकाला तरी तुम्ही गोळ्या घातल्या आहेत का?'' असा प्रश्‍न सत्यपाल मलिक यांनी केला. कारगिल दिनानिमित्त आयोजित "कारगिल - लडाख टुरिझम फेस्टिव्हल-2019' उद्‌घाटन मलिक यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

कोणत्याही समस्येचे उत्तर बंदुकीने मिळणार नाही, असे स्पष्टीकरणही लगेच मलिक यांनी दिले. यासाठी त्यांनी श्रीलंकेतील "एलटीटीई'च्या समस्येचेही उदाहरण दिले. "दहशतवाद्यांच्या बंदुकांपुढे भारत सरकार कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडावा, '' असे मलिक म्हणाले. 

"कारगिल आणि लेह या दोन जिल्ह्यांमध्ये पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. कारगिल विमानतळाच्या विस्तारासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, '' असेही मलिक यांनी या वेळी सांगितले. 

उमर अब्दुला यांची टीका 
राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे. संविधानिक पदावरील व्यक्ती जबाबदार असतो. भ्रष्ट नेत्यांची हत्या करण्यास सांगणाऱ्या मलिक यांनी दिल्लीत त्यांची काय प्रतिष्ठा आहे, हे तपासून पाहिले पाहिजे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jammu Governor Satyapal Malik controversial statement