११ महिन्यांपूर्वी एन्काउंटर; मुलाचा मृतदेह मिळण्यासाठी वाट पाहतोय बाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

११ महिन्यांपासून मुलाचा मृतदेह मिळण्यासाठी वाट पाहतोय बाप

अतहरच्या एन्काउंटरची माहिती मिळाल्यानंतर ११ महिन्यांपूर्वीच मुश्ताक यांनी कबर खोदली होती. मात्र आजही मुश्ताक यांना मुलाचा मृतदेह मिळू शकलेला नाही.

११ महिन्यांपासून मुलाचा मृतदेह मिळण्यासाठी वाट पाहतोय बाप

काश्मीरमध्ये गेल्या ११ महिन्यांपासून एक बाप आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह मिळण्यासाठी वाट बघत आहे. मात्र सातत्यानं पाठपुरावा आणि प्रयत्न केल्यानंतरही अद्याप मृतदेह मिळू शकलेला नाही. गेल्या वर्षी २९ डिसेंबर २०२० रोजी १६ वर्षीय अतहर मुश्ताक घरी परतला नाही. तेव्हा वडिलांनी चौकशी केल्यानंतर अशी माहिती समजली की, मुलगा पोलिसांच्या एका एन्काउंटरमध्ये ठार झाला. आजपर्यंत मुश्ताक वानी हे मुलाचा मृतदेह मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. अतहरच्या एन्काउंटरची माहिती मिळाल्यानंतर ११ महिन्यांपूर्वीच मुश्ताक यांनी कबर खोदली होती. मात्र आजही मुश्ताक यांना मुलाचा मृतदेह मिळू शकलेला नाही.

मुश्ताक अहमद वानी यांनी म्हटलं की, अतहर अकरावीत शिकत होता. तो बोर्डाची परीक्षा देत होता. २९ डिसेंबरपर्यंत त्याने चार पेपर दिले होते. परीक्षेवेळी दुपारी २ वाजता त्याला नेण्यात आलं. आम्हाला माहिती नाही त्यानंतर काय झालं. पुढच्या दिवशी सकाळी ११ वाजता पोलिस कंट्रोल रुममध्ये त्याचा मृतदेह होता.

कुटुंबियांचे म्हणणे आहे की, जेव्हा श्रीनगरमध्ये लवेपोरात चकमकीत आणखी दोघांसोबत अतहर मारला गेला तेव्हा तो बोर्डाची परीक्षा देत होता. बोर्डाचा निकालसुद्धा आला असून त्यामध्ये अतहर अखेरच्या पेपरला अनुपस्थित असल्याचं दाखवत आङे. घरातून निघाल्यानंतर तीन तासातच अतहरला एन्काउंटरमध्ये मारण्यात आलं.

पोलिसांनी अतहरचा मृतदेह सोनमर्गमध्ये दफन केला होता. वानी यांनी आरोप केला की परीक्षेच्या शेवटच्या पेपरआधी त्याची हत्या करण्यात आली. मी त्याच्या मृतदेहाची मागणी करून थकलो पण कोणीही ऐकत नाहीय. जेव्हा एन्काउंटर झाला तेव्हा पोलिसांकडून वेगवेगळी माहिती दिल्याचंही अतहरच्या वडिलांनी म्हटलं आहे. तसंच पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये मारण्यात आलेल्या तिघांना दहशतवादी म्हणून नोंद केलं नव्हतं. मात्र दोन दिवसांनी तिघेही दहशतवाद्यांचे सहकारी होते असं म्हटलं होतं असाही दावा अतहरच्या वडिलांनी केला.

हेही वाचा: रेल्वेने बदलला रामायण एक्सप्रेसच्या वेटर, कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड

अतहरच्या कुटुंबियांनी असा आरोप केला आहे की, पूर्वनियोजित असा हा एन्काउंटर होता. त्यात मारण्यात आलेल्या तीन लोकांमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचाही समावेश होता. असे अनेक प्रकार समोर आले आहेत ज्यांचे मृतदेह अद्याप नातेवाईकांकडे देण्यात आलेले नाहीत. आजसुद्धा अनेक कुटुंबं मृतदेह मिळावा म्हणून वाट पाहात आहेत.

loading image
go to top