Jammu Kashmir : जम्मूत कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा; शस्त्रसाठा हस्तगत

पीटीआय
Thursday, 19 November 2020

तब्बल दोन तास धुमश्‍चक्री चालली. यात चार दहशतवादी मारले गेले. तर एसओजीचे तीन जवान जखमी झाले. हे दहशतवादी जैशे महंमदचे असल्याचा संशय लष्कराने व्यक्त केला आहे. 

जम्मू - सुरक्षा दलाने आज मोठी कारवाई करत दहशतवाद्यांच्या एका गटाचा खातमा केला. नगरोटा येथील टोलनाक्यावर जम्मूहून श्रीनगरकडे शस्त्रे आणि स्फोटके घेऊन जाणारा ट्रक पहाटे ४.५० च्या सुमारास अडवला. तेव्हा ट्रकमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. त्यावेळी जवानांनी शोध मोहिम राबवली आणि तब्बल दोन तास धुमश्‍चक्री चालली. यात चार दहशतवादी मारले गेले. तर एसओजीचे तीन जवान जखमी झाले. हे दहशतवादी जैशे महंमदचे असल्याचा संशय लष्कराने व्यक्त केला आहे. 

संशयित ट्रकमध्ये तांदळाची पोती होती आणि त्यात दहशतवादी लपून बसले होते. त्यांना टोलनाक्यावर तपासणीदरम्यान हटकले असता त्यांनी गोळीबार सुरू केला आणि जंगलाच्या दिशेने पोबारा केला. तेव्हा जवानांनी पाठलाग करत त्यांच्यावर कारवाई सुरू केली. त्यात चार दहशतवादी मारले गेले. घटनास्थळाहून अकरा एके रायफल्स, तीन पिस्तुल, २९ ग्रेनेड, सहा यूबीजीएल ग्रेनेड, मोबाईल फोन आदी स्फोटके आणि साहित्य जप्त केले. चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने ग्रेनेड फेकले. यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून ते मोठा घातपात घडवून आणण्याची तयारी करत होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेषत: जम्मू आणि काश्‍मीरची निवडणूक प्रक्रिया हाणून पाडण्याचा त्यांचा डाव होता. मृत दहशतवादी जैशे महंमद संघटनेशी निगडीत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद 
जखमी जवानात अखनूरचे कुलदिप राज आणि बनिहालचे नील कासिम, रामबनचे मोहंमद इसाक मलिक यांचा समावेश आहे. जखमी जवानांना जीएमसी जम्मूत दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीनंतर नगरोटातील लष्करी तळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. तसेच जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद केला आहे. दहशतवाद्यांनी जम्मू काश्‍मीरच्याच ट्रकचा वापर केला होता. 

मृत दहशतवादी पाकचे? 
जम्मू काश्‍मीर पोलिसचे महानिरीक्षक विजय विजय कुमार म्हणाले की, काश्‍मीरमध्ये पाकिस्तानातून दहशतवादी येत असल्याची खबर लागली होती. त्यानुसार सीमेलगतच्या भागावर पाळत ठेवली जात असून काल नगरोटा टोल नाक्यावर दहशतवादी येत असल्याचे कळाले होते. कारवाईच्या वेळी ट्रक चालक फरार झाला. सीआरपीएफच्या जवानांची लष्कराला खंबीर साथ मिळत असल्याचे विजयकुमार म्हणाले. मृत दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचा संशय असून आपण डीडीसी निवडणूक यशस्वी करु, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

सांबा सेक्टरमधून भारतात घुसले 
जम्मू काश्‍मीर पोलिसचे महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले, की जैशेचे चारही दहशतवादी बुधवारी रात्री सांबा सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेतून घुसले असावे. ते जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महागार्गावरुन ट्रकने जात होते. पोलिसांनी नगररोटा टोल नाक्यावर रोखले असता दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. राष्ट्रीय महामार्गावरची यावर्षीची ही दुसरी चकमक होती. यापूर्वी जानेवारीत तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. तेही असेच ट्रकमध्ये लपून बसले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jammu Kashmir Nagrota on Jammu Srinagar Highway encounter near Ban toll plaza 4 terrorist gun down