केंद्रीय मंत्रिमंडळात आता 'जेडीयू'चा सहभाग नाही : नितीशकुमार

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जून 2019

 केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचे सर्व दरवाजे संयुक्‍त जनता दलाने (जेडीयू) बंद केले आहेत. भविष्यात आम्ही केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे पक्षाध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर येथे आल्यावर ते पत्रकारांबरोबर बोलत होते. 

पाटणा : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचे सर्व दरवाजे संयुक्‍त जनता दलाने (जेडीयू) बंद केले आहेत. भविष्यात आम्ही केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे पक्षाध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर येथे आल्यावर ते पत्रकारांबरोबर बोलत होते. 

मोदी मंत्रिमंडळात "जेडीयू'ला तीन मंत्रिपदे अपेक्षित होती. पण, ती न मिळाल्यामुळे नितीशकुमार नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच, पक्षाच्या खासदारांच्या संख्याबळाच्या तुलनेत मंत्रिपद न मिळणे, हेही एक कारण आहे. याबद्दल बोलताना, "अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना पक्षाच्या खासदारसंख्येच्या आधारावर मंत्रिपद मिळत होते. पण, केंद्रात भाजपला एकट्याला बहुमत असल्यामुळे आता तसे होणार नाही,' असे मत नितीशकुमार यांनी व्यक्त केले. 

"जेडीयू'चे लोकसभेत सोळा आणि राज्यसभेत सहा, असे एकूण 22 खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय हा पक्षाचा असल्यामुळे याबद्दल वाईट वाटून घेण्याचे काहीही कारण नाही, असे सांगून ते म्हणाले, की याविषयी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. 

मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून राज्यातील भाजप आणि जेडीयू यांच्या आघाडीवर काही परिणाम होईल का, या प्रश्‍नावर नितीशकुमार म्हणाले, की राज्यातील सरकार आम्ही भाजपसोबत मिळून चालवत आहोत. त्यामुळे याचा आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत कटुता निर्माण होऊ शकते, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JDU is not involved in the Cabinet says Nitish Kumar