पुण्याच्या चिरागची पुन्हा बाजी! आता JEE Advance मध्ये देशात अव्वल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

JEE Advance 2020 Results आज जाहीर करण्यात आला. यामध्ये पुण्याच्या चिराग फलोर टॉप रँकमध्ये आला आहे.

नवी दिल्ली - JEE Advance 2020 Results आज जाहीर करण्यात आला. यामध्ये पुण्याच्या चिराग फलोर टॉप रँकमध्ये आला आहे. एकूण 43 हजार 204 विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्सची पात्रता परीक्षा पास केली आहे. यात 6 हजार 707 मुलींचा समावेश आहे. 

आयआयटी बॉम्बे झोनमधील चिराग फलोरने जेईई अॅडव्हान्स 2020 मध्य कॉमन रँक लिस्टमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने 396 पैकी 352 गुण मिळवले आहेत. तर आयआयटी रुकडी झोनची कनिष्क मित्तल कॉमन रँक लिस्टमध्ये 17 वी आली असून मुलींमध्ये पहिली आहे. तिने 396 पैकी 315 गुण मिळवले. 

चिरागने जेईई मेन्समध्येसुद्धा देशात 12 वा तर दिल्ली एनसीटीमध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. जेईई मेन्समध्ये त्याने 300 पैकी 296 गुण पटकावले होते. चिरागने जगातील सर्वोत्तम इंस्टिट्यूट मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये प्रवेश देखील मिळवला आहे. एमआयटीसारख्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरही चिरागने अनुभव घेण्यासाठी म्हणून JEE परिक्षा दिली होती. 

यंदाच्या परीक्षेचा निकाल तयार करताना 12 वी च्या गुणांना गृहित धरलं नव्हतं. नव्या नियमांनुसार निकाल जाहीर करण्यात आले आहेत. याआधी जेईई अॅडव्हान्स परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 वीमध्ये किमान 75 टक्के गुण मिळवणे बंधनकारक होते. यंदा कोरोनामुळे सीबीएसई आणि सीआयएससीईसह अनेक बोर्डांनी राहिलेले पेपर न घेता इतर निकषांच्या आधारे निकाल दिला आहे. 

मेरिटच्य आधारावर निकाल जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 ऑक्टोबरपासून काउन्सिलिंग सुरू करण्यात य़ेणार आहे. वेळेवर प्रवेश आणि क्लासला सुरुवात करण्यासाठी यंदा काउन्सिंलिंग राउंडची संख्या सात ऐवजी सहा करण्यात आली आहे. 27 सप्टेंबरला परीक्षा पार पडल्यानंतर कमी वेळेत निकाल देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jee advance result 2020 pune chirag falor top rank in india