झारखंडमध्ये काँग्रेसचा विजय अन् राहुल समर्थकांना दिलासा 

rahul-gandhi
rahul-gandhi

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायदा आणि "एनआरसी'वरून कोंडी झालेल्या भाजपला झारखंड विधानसभा निवडणुकीत धोबीपछाड मिळाल्याने काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. प्रादेशिक पक्षांपुढे दुय्यम स्थान स्वीकारावे लागले असले तरी मोदी-शाह जोडीकडून आणखी एक राज्य हिसकावल्याचा आनंद काँग्रेससाठी पुरेसा ठरला आहे. विशेष म्हणजे, निर्णायकक्षणी राहुल गांधींच्या अनुपस्थितीचा मुद्दा या निकालांमुळे बाजूला झाल्याने राहुल समर्थकांनीही सुटकेचा नि:श्‍वास टाकल्याचे चित्र आहे. 

राहुल गांधी पायउतार झाल्यानंतर सोनिया गांधी कॉंग्रेस अध्यक्ष होताच पक्षाची स्थिती सुधारल्याचे महाराष्ट्र, हरियानापाठोपाठ झारखंड हे तिसरे उदाहरण ठरले आहे. मावळत्या वर्षात हरियाना आणि महाराष्ट्रामध्ये स्वबळावर सत्ता मिळाली नसली, तरी लक्षणीय प्रमाणात वाढलेल्या जागांमुळे कॉंग्रेसचा आनंद दुणावला होता. आता त्यात झारखंडचीदेखील भर पडली आहे. मात्र, आधीच्या दोन राज्यांप्रमाणेच झारखंडमध्येदेखील काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत आणि प्रचारात राहुल गांधीची भूमिका किरकोळ होती. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणकून पराभव झाल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली या आधीही राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात कॉंग्रेसची सत्ता आली असली, तरी संघटनेत जुने नेते विरुद्ध नवे नेते असा संघर्ष रंगला होता. अशात सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यानंतर कॉंग्रेसमधील जुन्या नेत्यांचे संघटनेवर पुन्हा वाढलेले वर्चस्व आणि राहुल गांधींनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून राखलेले अंतर यामुळेही राहुल समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. अलीकडच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये सोनिया गांधींनीही प्रचारात भाग घेतला नव्हता. मात्र वरिष्ठ नेत्यांना आपापल्यापरीने रणनिती आखण्याची पूर्णपणे मोकळीक मिळाल्याने बाजूला पडलेल्या राहुल समर्थक नेत्यांच्या कोंडीत आणखी भर पडली होती. 

दरम्यान, आपले अध्यक्षपद हंगामीच असेल असे सोनिया गांधींनी स्पष्ट केल्यानंतर राहुल गांधींकडे पुन्हा नेतृत्व सोपविण्याची मागणी कॉंग्रेसमध्ये राहुल समर्थकांनी सुरू केली आहे. मात्र, संसद अधिवेशन काळात गैरहजेरी त्याचप्रमाणे एनआरसीवरून देशभरात आंदोलन पेटले असताना राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर कॉंग्रेसमध्येच दबक्‍या आवाजात नाराजी व्यक्त होत होती. मात्र झारखंड मुक्ती मोर्चाच्या मदतीने झारखंडमध्ये भाजपला सत्तेपासून रोखण्यात कॉंग्रेसला यश मिळाल्याने राहुल समर्थक अधिक आनंदी झाले आहेत. 

काँग्रेस मुख्यालयात उत्सव 
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा कल झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीच्या बाजूने झुकल्याचे दिसू लागल्यानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी उत्सव साजरा केला. ढोल-ताशांचा गजर, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आणि फटाक्‍यांची आतशबाजी असे वातावरण "24 अकबर मार्ग' या मुख्यालयात दिसले. झारखंडचे प्रभारी आरपीएन सिंह यांच्यासोबतच गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे आदी नेत्यांनीही मुख्यालयात हजेरी लावली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com