आजारी लालूप्रसाद यादव यांना जामिनासाठी पाहावी लागणार वाट

सकाळ ऑनलाइन टीम
Friday, 29 January 2021

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांची किडनी पूर्ण कार्यक्षमतेने काम करत नाहीये. त्यांच्या कुटुंबीयाकडून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचाराची मागणी केली जात आहे. 

रांची- राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे. चारा घोटाळ्यातील दुमका कोषागार घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांनी अर्धी शिक्षा भोगल्याचा दावा केला आहे. यावर शुक्रवारी सीबीआयने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितली आहे. लालूप्रसाद यादव यांच्याकडून दाखल करण्यात आलेली प्रत मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर उत्तर देण्यात येईल असे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर न्या. अपरेशकुमार सिंह यांच्या न्यायालयाने सीबीआयला उत्तर दाखल करण्यास वेळ देत 5 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. लालूप्रसाद यादव यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांची किडनी पूर्ण कार्यक्षमतेने काम करत नाहीये. त्यांच्या कुटुंबीयाकडून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचाराची मागणी केली जात आहे. 

दुमका कोषागार प्रकरणात सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे. लालूप्रसाद यादव यांनी याप्रकरणात अर्धी शिक्षा भोगल्याचा दावा यापूर्वीही केला आहे. परंतु, दोन्हीवेळेस अर्धी शिक्षा पूर्ण केल्याच्या समर्थनात ते पुरावे सादर करु शकलेले नाहीत. दस्ताऐवज सादर केल्यानंतर लालू यांच्याकडून वेळ मागण्यात आला होता. 25 जानेवारीला कनिष्ठ न्यायालयाचा रेकॉर्ड सादर करण्यात आला. 

मिळालेल्या माहितीनुसार लालूप्रसाद यांची अर्धी शिक्षा 8 फेब्रुवारी रोजी पूर्ण होत आहे. सीबीआयने आतापर्यंत लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेचा अर्धा काळ पूर्ण झाला नसल्याचे म्हटलेले आहे. लालूप्रसाद यांना जामीन मिळाला तर ते कारागृहाबाहेर येतील. त्यांची तब्येत अजूनही बिघडलेलीच आहे. दिल्लीतील एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे येत्या 5 फेब्रुवारीला सीबीआयकडून न्यायालयात काय भूमिका घेतली जाते आणि लालूप्रसाद यादव यांना जामीन मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jharkhand High Court defers bail of RJD chief Lalu Prasad Yadav in connection with Fodder scam case