esakal | मैत्रीला सलाम! मित्रासाठी केला १३०० किमीचा प्रवास; २४ तासांत आणला ऑक्सिजन सिलिंडर

बोलून बातमी शोधा

Devendra Sharma and Rajan
मैत्रीला सलाम! मित्रासाठी केला १३०० किमीचा प्रवास; २४ तासांत आणला ऑक्सिजन सिलिंडर
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

रांची : जगात अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये लोक मैत्रीसाठी कितीही मोठा त्याग करायला मागेपुढे पाहत नाहीत. अडचणीत असलेल्या मित्राच्या मदतीसाठी लोक अनेक जुगाडही करतात. असंच खऱ्या मैत्रीचं उदाहरण झारखंडमधील एका व्यक्तीनं स्थापित केलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मित्रासाठी ही व्यक्ती १३०० किमीचा प्रवास करुन २४ तासांत ऑक्सिजन घेऊन आली.

त्या फोननंतर सुरु झाला प्रवास

देवेंद्रकुमार शर्मा यांना २४ एप्रिल रोजी मित्र संजय सक्सेना यांचा फोन आला. या दोघांचा जीवलग मित्र राजन याला कोरोनाचा संसर्ग झाला असून तात्काळ मेडिकल ऑक्सिजनची गरज आहे आणि राजन यांच्याजवळ केवळ २४ तासांचाच ऑक्सिजन शिल्लक असल्याचं संजय यांनी देवेंद्र यांना सांगितलं. या फोननंतर देवेंद्र त्याच रात्री आपल्या बाईकवरुन बोकारोकडे रवाना झाले. बोकारे येथे पोहोचण्यासाठी त्यांना सुमारे १५० किमीहून अधिक दूरपर्यंत बाईक चालवावी लागली. राजन आणि देवेंद्र हे दोघेही मूळचे याच शहरातील आहेत. देवेंद्र यांनी बोकारोमध्ये ऑक्सिजन मिळवण्यासाठी मोठी धडपड केली पण त्यांना कुठेही ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाला नाही. त्यानंतर त्यांनी झारखंड गॅस प्लान्टचे मालक राकेशकुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधला.

सिलेंडर दिला पण पैसे घेतले नाहीत

दरम्यान, राकेश गुप्ता यांनी देवेंद्र यांना ऑक्सिजनचा सिलेंडर दिला पण त्यासाठीचे पैसे घेतले नाहीत. त्यांनी म्हटलं की, देवेंद्र यांनी आधी आपल्या मित्राची काळजी करावी, पैशाचं नंतर पाहू. यानंतर हा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन गाजीयाबाद येथे पोहोचण्यासाठी देवेंद्र यांना १३०० किमी अंतर जावं लागणार होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या एका मित्राची कार मागवली आणि २५ एप्रिल रोजी वैशाली जिल्ह्याकडे जायला निघाले. त्यानंतर २४ तासांचा प्रवास केल्यानंतर अखेर ते २६ एप्रिल रोजी वैशालीत पोहोचले.

रस्त्यात पोलिसांनी केली तपासणी

देवेंद्र यांनी सांगितलं की, रस्त्यात त्यांना एका चेकपोस्टवर पोलिसांनी अडवलं आणि ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कुठे चाललात याबाबत विचारणा केली. त्यावर देवेंद्र यांनी पोलिसांनी सर्व हकिकत सांगितली. देवेंद्र यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनीही त्यांना लगेच जाऊ दिलं.

दरम्यान, एका मित्रानं दुसऱ्या मित्रासाठी घेतलेल्या मेहनतीमुळं अखेर राजन यांची प्रकृती आता सुधारली आहे. त्यांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकल्यानंच हे घडलं असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.