कोलकत्याचा संस्थापक मिळाला; 'ही' आहे ती व्यक्ती!

श्‍यामल रॉय
Saturday, 31 August 2019

हुगळी नदीच्या किनाऱ्यावर 24 ऑगस्ट 1690 मध्ये उतरलेला जोब चार्नोक हाच कोलकता शहराचा संस्थापक आहे काय? या प्रश्‍नावरून येथे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुकवरील एका पोस्टनंतर ही चर्चा सुरू झाली आहे.

कोलकता : हुगळी नदीच्या किनाऱ्यावर 24 ऑगस्ट 1690 मध्ये उतरलेला जोब चार्नोक हाच कोलकता शहराचा संस्थापक आहे काय? या प्रश्‍नावरून येथे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुकवरील एका पोस्टनंतर ही चर्चा सुरू झाली आहे.

कोलकता या शहराचा स्थापना दिन अनेक वर्षे 24 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जात होता. सरकारी पातळीवरही ही माहिती मान्य केली होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या चार्नोकला तेव्हाच्या जमीनदाराने तीन गावे विकली आणि तीच गावे नंतर "कलकत्ता' म्हणून प्रसिद्ध झाली. मात्र, या जमीनदाराच्या वारसांपैकी एक असलेले सबर्ण रॉय चौधरी यांनी 2003 मध्ये या मान्यतेविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाने निकाल देताना कोलकत्याचा संस्थापक आणि स्थापना दिन निश्‍चित ठरविणे अवघड असल्याचा निकाल दिला.

त्यानंतर आता अनेक वर्षांनी येथील स्टार प्रसेनजित चटर्जी याने 24 ऑगस्टला फेसबुकवरून "हॅपी बर्थडे कोलकता' असे म्हटले आणि चौधरी यांनी त्याला चुकीची माहिती पसरवित असल्याची नोटीस बजावली. त्यामुळे पुन्हा एकदा 16 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या चर्चेला उधाण आले आहे. 

इतिहासकारांचे म्हणणे

उच्च न्यायालयाने 2003 मध्ये पाच इतिहासकारांची एक समिती स्थापन करून त्यांच्याकडून अहवाल मागविला. त्यानुसार, कोलकता हे शहर खेड्यांमधून विकसित झाले आणि तिथे ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू व्यापारउदीम वाढविला. 18व्या शतकात हा भाग शहर म्हणून अस्तित्वात येऊ लागला. कोलकत्याचे अभ्यासक पी. थंकप्पन नायर यांच्या दाव्यानुसार चार्नोकच्या आधीपासूनच हा भाग शहरी म्हणून ओळखला जात असल्याने चार्नोक संस्थापक असूच शकत नाही. 

डाग पुसून टाकण्यासाठी.... 

चौधरी यांच्या पूर्वज जमीनदाराने ईस्ट इंडिया कंपनीला सुतानती, गोविंदपूर आणि कोलिकता ही तीन गावे विकली आणि येथे बसविण्यास जागा मिळाल्याने नंतर इंग्रजांना भारतावर राज्य करण्यास मदत झाली, असाच समज होता. यामुळे चौधरी कुटुंबाकडे लोक आरोपीच्याच दृष्टिकोनातून पाहत होते.

हा डाग पुसून काढण्यासाठी कुटुंबाने 90 च्या दशकात जुन्या कागदपत्रांची प्रचंड शोधाशोध केली. 1997 मध्ये त्यांना पारशी भाषेत लिहिलेला एक कागद सापडला. त्यात जमीनदाराने 1300 रुपये प्रतिवर्ष या दराने तीन गावे ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिल्याचा उल्लेख होता. या कागदावरील तारीख ही चार्नोकच्या मृत्यूनंतर सहा वर्षांची होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job Charnock is Founder of Kolkata Discussion After FB Post