भाजपचे नव्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब; 'हे' घेणार शहांची जागा

वृत्तसंस्था
Monday, 20 January 2020

2014 मध्ये पक्षाध्यक्ष झालेले अमित शहा यांच्याकडे 2019 च्या विजयानंतर मोदींनी क्रमांक दोनच्या गृहमंत्रिपदाची सूत्रे दिली. मात्र त्यामुळे शहा यांना पक्षाच्या जबाबदाऱ्यांना पूर्ण वेळ देता येणे अशक्‍य बनले.

नवी दिल्ली : केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीसाठीची औपचारिक प्रक्रिया आज (सोमवारी) पार पडणार असून, आज दुपारी जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे हिमाचल प्रदेशातून पहिल्यांदाच भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी निश्‍चित केलेले कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे एकमेव नाव अध्यक्षपदासाठी असल्याने ही निवडणूक बिनविरोध निश्‍चित आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सलग दोनदा स्पष्ट बहुमताने दिल्लीचे तख्त काबीज करणारा पहिला काँग्रेसेतर पक्ष असा विक्रम घडविलेला भाजप मोदींच्या नेतृत्वाखाली तब्बल 11 कोटी सदस्य संख्या असलेला जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्षही ठरला आहे.

‘काश्‍मिरात कशाला हवे इंटरनेट?’ - सारस्वत

2014 मध्ये पक्षाध्यक्ष झालेले अमित शहा यांच्याकडे 2019 च्या विजयानंतर मोदींनी क्रमांक दोनच्या गृहमंत्रिपदाची सूत्रे दिली. मात्र त्यामुळे शहा यांना पक्षाच्या जबाबदाऱ्यांना पूर्ण वेळ देता येणे अशक्‍य बनले. गृहमंत्रालयाचाही कारभार त्यांना अपेक्षित त्या गतीने चालविण्यात अडथळे येऊ लागल्याचे निदर्शनास आले. याचा फटका पक्षाला अनुक्रमे झारखंड व महाराष्ट्रातील सत्ता गमावणे व सीएए कायद्याच्या संभाव्य विरोधाची पुरेशी पूर्वकल्पना न येणे, या रूपाने बसला असे भाजप नेते मान्य करतात. परिणामी, शहा यांच्याऐवजी नड्डा यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्याचे दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी निश्‍चित केले. त्यानुसार नड्डा यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याची निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे. 

निवडणूक अधिकारी व माजी कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी हा कार्यक्रम पाहिला. त्यानुसार सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 12.30 या वेळेत नड्डा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाची छाननी दुपारी 12.30 ते 1.30 या काळात झाली. त्यानंतरच दुपारी अधिकृत घोषणा करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JP Nadda Set To Take Over From Amit Shah As New BJP Chief