esakal | 'जस्ट डायल'चा ताबा रिलायन्स व्हेंचर कडे; 66 टक्के समभाग मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

mukesh ambani

'जस्ट डायल'चा ताबा रिलायन्स व्हेंचर कडे; 66 टक्के समभाग मिळणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : विविध माध्यमांमधून ग्राहकांना वेगवेगळ्या सेवांची माहिती देणारे लोकप्रीय सर्च इंजिन जस्ट डायलचा (Just Dial) ताबा घेत असल्याचे रिलायन्स व्हेंचर लि. या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपनीने आज जाहीर केले. यासाठी रिलायन्स व्हेंचरने (Reliance Ventures) तीन हजार 497 कोटी रुपये मोजले आहेत. (Just Dial owned Reliance Ventures Will get 66 per cent stake)

रिलायन्स (Reliance) तर्फे आज ही घोषणा करण्यात आली. आज यासंदर्भात झालेल्या करारानुसार रिलायन्स व्हेंचर (Reliance Ventures) कडे जस्ट डायलची 40.95 टक्के मालकी (समभाग) येणार असून, आणखी 26 टक्के समभाग रिलायन्सतर्फे खुल्या बाजारातून विकत घेतले जातील. तरीही जस्ट डायलचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. व्ही. एस. मणी हेच ती दोन्ही पदे सांभाळतील, असेही आज जाहीर करण्यात आले.

यासंदर्भात, आज रिलायन्स व्हेंचर, जस्ट डायल, श्री. मणी व इतरांमध्ये करार करण्यात आला. त्यानुसार, रिलायन्स व्हेंचरला जस्ट डायलचे दोन कोटी 12 लाख समभाग (25.33 टक्के वाटा) प्रेफरन्शिअल अॅलॉटमेंट स्वरुपात मिळतील. यासाठी रिलायन्सतर्फे प्रत्येक समभागासाठी एक हजार 22 रुपये 25 पैसे दिले जातील. तर श्री. मणी यांच्याकडून रिलायन्स 1 कोटी 31 लाख समभाग (15.62 टक्के वाटा) प्रत्येकी एक हजार 20 रुपये या दराने घेईल. त्यानंतर रिलायन्सतर्फे खुल्या बाजारातून सेबी च्या नियमांनुसार दोन कोटी 17 लाख समभाग (26 टक्के वाटा) विकत घेतले जातील. त्यामुळे रिलायन्सचा जस्ट डायलमधील मालकी हक्क 66 टक्क्यांपेक्षाही जास्त होईल.

जस्ट डायलचा समभाग आज दिवसअखेरीस 34 रुपयांनी घसरून 1,072 रुपयांवर बंद झाला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याचा दर सहाशे रुपयांच्या आसपास तर मे महिन्यात 700 रुपयांच्या जवळपास होता. जस्ट डायलतर्फे ग्राहकांना कोणत्याही सेवांची माहिती दूरध्वनी, वेबसाईट, अॅप, एसएमएस आदी माध्यमांच्याद्वारे त्वरेने दिली जाते. या व्यवहारामुळे डिजिटल व्यापार क्षेत्राला आणखी चालना मिळणार असून याचा फायदा आमचे लाखो भागीदार व्यापारी-छोटे व्यावसायिक आदींना मिळेल, व्यवसायवृद्धी करतानाच जस्ट डायलच्या नव्या पिढीच्या अनुभवी व्यवस्थापनाबरोबर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे रिलायन्स व्हेंचरच्या संचालक श्रीमती इशा अंबानी म्हणाल्या.

loading image