देशात राजकीय आघाडीसाठी पुढाकार घेणार - चंद्रशेखर राव

आर. एच. विद्या
मंगळवार, 6 मार्च 2018

सुरवातीला ते प्रशासकीय सेवेतील माजी आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रादेशिक व राष्ट्रीय राजकीय घडामोडी जवळून अनुभवल्या आहेत. देशाच्या विविध भागांत काम करताना त्यांना आलेल्या अनुभवाचा लाभ घेण्याचा राव यांचा प्रयत्न आहे

हैदराबाद - राजकारणात गुणात्मक बदल घडविण्यासाठी देशात राजकीय आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यास तयार असल्याचे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले आहे. यासाठी आपण लवकच देशभरातील विविध संस्था, संघटना; तसेच तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरवातीला ते प्रशासकीय सेवेतील माजी आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रादेशिक व राष्ट्रीय राजकीय घडामोडी जवळून अनुभवल्या आहेत. देशाच्या विविध भागांत काम करताना त्यांना आलेल्या अनुभवाचा लाभ घेण्याचा राव यांचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री राव लष्करातील माजी अधिकारी, विधीज्ञ, अर्थतज्ज्ञांशीही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहेत. विविध शेतकरी संघटना; तसेच देशाच्या माजी अर्थसचिवांशीदेखील ते विचारविनिमय करतील.

यानंतर ते विविध वृत्तपत्रे, पत्रकार, उद्योजक, कामगार संघटना यांच्या समवेतही बैठका आयोजित करणार आहेत. प्रामुख्याने हैदराबाद, नवी दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई येथे या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी निमंत्रितांच्या याद्या बनविण्याचे कामही सुरू झाले आहे. जे लोक देशाविषयी विविध मार्गाने विचार करतात त्यांना राजकारणात गुणात्मक बदल करण्याच्या या कामात सहभागी करून घेण्याची मुख्यमंत्री राव यांची इच्छा आहे.

Web Title: k chandrashekhar rao telangana politics snn