गृहिणींना महिन्याला पगार; कमल हसन यांच्या अश्वासनाचं होतंय कौतुक

टीम ई सकाळ
Tuesday, 5 January 2021

कमल हसन यांनी मक्कल नीधी मय्यम पक्ष स्थापन केल्यानंतर आता तामिळनाडुच्या निवडणुकीमुळे सातत्याने चर्चेत आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची चर्चा सध्या सर्वाधिक होत आहे.

चेन्नई - दक्षिणेच्या राजकारणात उतरलेल्या कमल हसन यांनी मक्कल नीधी मय्यम पक्ष स्थापन केल्यानंतर आता तामिळनाडुच्या निवडणुकीमुळे सातत्याने चर्चेत आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची चर्चा सध्या सर्वाधिक होत आहे. यातील एका आश्वासनाचे कौतुक काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनीही केलं आहे. कमल हसन यांनी असं आश्वासन दिलं आहे की, सत्तेत आल्यानंतर गृहिणींना दर महिन्याला वेतन देण्यात येईल. कमल हसन यांच्या या आश्वासनाचं 

कमल हसन यांच्या मक्कल नीधी मय्यम पक्षाने तामिळनाडु विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षाने आर्थिक अजेंडा जोरात पुढे नेण्याचं काम सुरु केलं आहे. यामध्ये तामिळनाडुत गृहिणींना मासिक वेतन देण्याचं आश्वासन दिलं आहे.

मक्कल नीधी मय्यमने म्हटलं आहे की, महिलांना शिक्षण, रोजगार आणि उद्योगासाठी सशक्त बनवलं जाईल. पक्षाच्या मते ज्या महिला घरी राहतात त्यांच्याकडे समाज अनेकदा दुर्लक्ष करतो. त्यांना आणि त्यांच्या कामाला महत्त्व दिलं जात नाही. यासाठी पक्ष त्यांना मासिक वेतन देईल. या महिलांची प्रतिष्ठा वाढण्यास यामुळे मदत होईल. याबाबत पक्षाने सात कलमी सुशासन आणि आर्थिक अजेंडा मांडला आहे. 

हे वाचा - दादाच्या आजारपणाचा कंपनीला धसका; जाहिरात घेतली मागे

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी कमल हसन यांच्या या आश्वासनाचे कौतुक केले आहे. थरुर म्हणाले की, यामुळे घरी काम करणाऱ्यांना एक वेगळी ओळख मिळेल. अभिनेता कमल हसन यांनी अण्णा द्रमुक आणि द्रमुकवर टीका करताना म्हटलं की, आगामी विधानसभा निवडणुकीत तामिळनाडुच्या जनतेला भ्रष्टाचारी लोकांपासून सुटका हवी आहे. लोकांचे आम्हाला मिळत असलेलं प्रेम आणि पक्षाला वाढत असलेला पाठिंबा हे त्याचंच प्रतिक असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

हे वाचा - वर्षभरात सुमारे दोन हजार कोटींचे ड्रग्स जप्त, DRIची देशभरातील कारवाई

तामिळनाडुत महिलांना सुरक्षित वाटत नाही. अशा वातावरणात एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या संधीचा लोक वापर करून परिस्थिती बदलतील असा विश्वासही कमल हसन यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kamal haasan announced salary for housewives appreciate on social media