राहुल गांधींवर आरोप करणारे ट्विट घेतले मागे; कपिल सिब्बल यांचा खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 24 August 2020

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करणारे ट्विट, तासाभरातच मागे घेतले आहेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करणारे ट्विट, तासाभरातच मागे घेतले आहे

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करणारे ट्विट, तासाभरातच मागे घेतले आहे. राहुल यांनी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर  कपिल सिब्बल यांनी ट्विट केले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यावर सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती. मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर सिब्बल यांचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सिब्बल यांच्याशी चर्चा केलीय. त्यानंतर सिब्बल यांनी ट्विट मागे घेतले आहे. त्यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. 

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राच्या टायमिंगवर शंका घेतली आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi)  आजारी असताना त्यांना पत्र पाठवण्यात आले. काँग्रेस मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये राजकीय संकटाचा सामना करत होती, पक्षाच्या अध्यक्षा आजारी होत्या, तेव्हाच पत्र का लिहिण्यात आले, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे. 

राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान पत्र लिहिण्याच्या वेळेमागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. भाजपसोबत लागेबांधे असल्याने पक्ष संकटाच्या स्थितीत असताना पत्र लिहिण्यात आले, अशी शंका राहुल यांनी घेतली आहे. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांनी स्वत: सिब्बल यांच्याशी चर्चा करुन त्यांची नाराजी दूर केली आहे. माध्यमांतील कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी सिब्बल यांना सांगितलं आहे.

कपिल सिब्बल यांच्या एका ट्विटने काँग्रेसमध्ये खळबळ

काँग्रेसच्या २० पेक्षा अधिक वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहित नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. पक्षाला पूर्णवेळ आणि सक्रीय असा अध्यक्ष असावा. तसेच पक्षात वरपासून खालीपर्यंत बदल करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. पत्रात गांधी कुटुंबीयांवर थेट टिका करण्यात आली नाही. मात्र, लवकरात लवकर अध्यक्ष निवडण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पदासाठी निष्पक्ष निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. शिवाय पक्षाला अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार निवडण्यास सांगितलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सोनिया गांधीच्या समर्थनात पुढे आले आहे. त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहिणे दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. पक्षाच्या हाय कमांडला दुर्बेल करणे, पक्षाला दुर्बेल करण्यासारखे असल्याचं ते म्हणाले आहेत.

कोण म्हणतं काँग्रेस फक्त गांधी घराण्याचा पक्ष? 19 पैकी 14 अध्यक्ष इतर
 

कपील सिब्बल, शशी थरुर, गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, विवेद टांका, आनंद शर्मा यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहित तात्काळ नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये पेपर बॉम्ब फुटला आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांचा समर्थक गट पुढे आला असून त्यांनी अध्यक्षपद सांभाळावे अशी विनंती केली आहे. मात्र, राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष होण्याची कोणतीही इच्छा बैठकीत दाखवली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kapil Sibal Took back the tweets accusing Rahul Gandhi