काँग्रेसचा 'चाणक्य' आता ईडीच्या कचाट्यात

Congress
Congress

बेंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला घाम फोडून काँग्रेसची लाज राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांच्याकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोर्चा वळवला आहे.

ईडीच्या संभाव्य सुनावणीविरोधात शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयाने ती फेटाळल्याने शिवकुमार यांच्या ईडी चौकशीचा मार्ग मोकळा झाला होता. ईडीने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्याप्रमाणे शिवकुमार यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आज, शिवकुमार बेंगळुरूमध्ये ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहे.

डी. के. शिवकुमार यांच्यासह त्यांच्या मित्रांनी ईडीची नोटिस मागे घेण्यासाठी बेंगळुरूमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयाने याचिका फेटाळून लावत नोटिस मागे घेण्यास नकार दिला. दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट २०१७मध्ये प्राप्तिकर विभागाने शिवकुमार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकला होता. त्यात ८ कोटी ५९ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. या पैशांसदर्भात प्राप्तिकर विभागाने चौकशी केली होती. त्यात शिवकुमार यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. शिवकुमार यांनी मित्रांच्या मदतीने काळा पैसा पांढरा करण्याचे काम केले आहे. त्यासाठी काही संस्थांचा आधार घेतल्याचा आरोप आहे. त्यामाध्यमातून हजारो कोटी रुपये काळ्यातून पांढरे केल्याचा आरोप आहे.

कोण आहेत शिवकुमार?
अडचणीच्या काळात काँग्रेससाठी धावून येणारे नेते म्हणून कर्नाटकमधील डी. के. शिवकुमार यांचा उल्लेख केला जातो. जेव्हा जेव्हा काँग्रेसमध्ये बंडखोरीचा विषय येतो तेव्हा तेव्हा काँग्रेसने ते प्रकरम हाताळण्यासाठी डी. के. शिवकुमार यांना पाचारण केले आहे. २००२मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुख सरकार अडचणीत आल्यानंतर शिवकुमार यांनी ते प्रकरण हाताळले होते. कर्नाटकातील वोक्कलिंग समाजाचे नेते म्हणून, परिचित शिवकुमार गांधी घराण्याशी एकनिष्ठ मानले जातात. २०१७मध्ये अहमद पटेल यांच्या राज्यसभेच्या निवडीवेळी गुजरातमधील आमदार फुटण्याची शक्यता होती. त्यावेळीही शिवकुमार काँग्रेसच्या मदतीला धावून आले. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसला ७९ आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला ३७ जागा मिळाल्या. बहुमतासाठी ११२ जागांची गरज असताना भाजपच्या हातून सत्तेचा घास हिसकावून घेण्यात शिवकुमार यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर कर्नाटकमध्ये १३ काँग्रेस आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचे वास्तव्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये होते. तेथे शिवकुमार यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. हॉटेलबाहेर शिवकुमार यांनी आंदोलन केल्यानं ते पुन्हा चर्चेत आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com