आम्ही आश्वासने पूर्ण केली; भाजपच्या आश्वासनांचं काय? : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

भाजप आपल्या जाहीरनाम्यात बरेच काही लपवत आहे. ते सांगतात वेगळं आणि करतात वेगळं. भाजप कर्नाटकातील जनतेशी चर्चा करत नाही. भाजपचा जाहीरनामा फक्त तीन-चार लोकच तयार करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. हाच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांमधील फरक आहे. 

मंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगलोर येथे काँग्रेसकडून आज (शुक्रवार) जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यादरम्यान राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, ''मागील चार वर्षांमध्ये मोदी आणि भाजप सरकारने मोठी आश्वासने दिली. मात्र, त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मात्र, काँग्रेसने राज्यातील जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत'', असे राहुल गांधी यांनी सांगितले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, काँग्रेसचे घोषणापत्र कर्नाटकातील जनतेचा आवाज आहे. आम्ही प्रत्येक घरातील लोकांकडे जाऊन त्यांचा आवाज ऐकला आहे. आम्ही जनतेला होणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. जाहीरनामा तयार करण्यापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील जिल्ह्यात जाऊन जनतेची मते घेतली. राज्यातील सर्व भागात जाऊन त्यांच्याशी विचारविनिमय करून जाहीरनामा तयार केला. 

ते पुढे म्हणाले, भाजप आपल्या जाहीरनाम्यात बरेच काही लपवत आहे. ते सांगतात वेगळं आणि करतात वेगळं. भाजप कर्नाटकातील जनतेशी चर्चा करत नाही. भाजपचा जाहीरनामा फक्त तीन-चार लोकच तयार करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. हाच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांमधील फरक आहे. 

Web Title: Karnataka Congress releases manifesto Rahul Gandhi