काँग्रेसचे आता पाच राज्यांवर लक्ष!

गेल्या निवडणुकीत भाजपला १०४, काँग्रेसला ८० तर धर्मनिरपेक्ष जनता दलास ३७ जागांवर विजय मिळाला
karnataka election result 2023 congress party rahul gandhi priyanka gandhi politics
karnataka election result 2023 congress party rahul gandhi priyanka gandhi politicssakal

- अभय दिवाणजी

प्रत्येक विधानसभा निवडणुकीत राज्यकर्ते बदलण्याची अहमहमिका असलेल्या कर्नाटकमधील मतदारांनी यावेळी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊन भाजपला इंगा दाखवला आहे. येथे मोदी-शहांचा करिष्मा चालला नाही. तर राहुल व प्रियांकांची मोठी चलती दिसून आली. काँग्रेसचे आता आगामी विधानसभा निवडणुका लागणाऱ्या दक्षिणेतील तेलंगणासह मिझोराम, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या पाच राज्यांवर लक्ष आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपला १०४, काँग्रेसला ८० तर धर्मनिरपेक्ष जनता दलास ३७ जागांवर विजय मिळाला होता. सुरवातीला काँग्रेस व जेडीएसने मिळून सत्तासोपान सर केला होता. परंतु येथे भाजपने ‘ऑपरेशन लोट्‌स’द्वारे सत्ता हस्तगत करण्यात यश मिळवले. मात्र, भाजपच्या या सत्तापिपासूवृत्तीमुळे कन्नड जनतेत नाराजी होती.

भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रीमंडळातील अन्य सहकाऱ्यांनी कर्नाटकात जोरदार प्रचार करून वातावरण निर्मिती केली होती.

जातीचे ध्रुवीकरण करण्याच्या भाजपच्या योजनेला मतदारांनी नजरेआ़़ड करत काँग्रेसला साथ दिली आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी राज्यात दौरे करत भाजपविरोधी वातावरण पेटविले.

दक्षिणेतील भाजप प्रवेशाची कर्नाटक विधानसभा निवडणूक ही सुरुवात होती. तसेच, ही निवडणूक आगामी लोकसभेची ‘लिट्‌मस टेस्ट’ समजली जात होती. परंतु भाजपचा वारु रोखण्यात काँग्रेसला कर्नाटकात मोठे यश आले.

यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. यातून आगामी पाच राज्यांतील निवडणुका जिंकण्याचे लक्ष्य ठेवत काँग्रेस त्या त्या राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण तापविण्यात यशस्वी होईल का, हे पाहावे लागेल.

दक्षिणेतील तेलंगणाची निवडणूक डिसेंबरमध्ये होईल. तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. येथे भाजप अस्तित्वहीन आहे. त्यामुळे या ठिकाणी बीआरएस आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत होण्याची चिन्हे आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होईल.

पिता-पुत्रांची सद्दी

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने दिलेल्या ७५ नव्या चेहऱ्यांपैकी केवळ अकरा उमेदवारांना मतदारांनी स्वीकारले. बंगळुरू जिल्ह्यात रामलिंग रेड्डी व सोम्या रेड्डी, एम कृष्णय्या, प्रिया कृष्णा, दावणगिरी जिल्ह्यात शामनूर शिवशंकरप्पा (वय ९२) व एस. एस. मल्लिकार्जून हे पिता-पुत्र (सर्व काँग्रेस) विजयी झाले.

म्हैसूर मतदारसंघातून धर्मनिरपेक्ष जनता दलाचे जी. टी. देवेगौडा, हरिष गौडा हे पितापुत्र विजयी झाले. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे कुमारस्वामी यांना मतदारांनी स्वीकारले, तर त्यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी यांना मात्र नाकारले. सुळ्ळ मतदारसंघातील अत्यंत गरीब उमेदवार असलेल्या भाजपच्या भागिरथी मुरुळ्ळ या विजयी झाल्या.

‘इंदराम्मा’चे मोठे आकर्षण

हिजाब, मुस्लिमांचे रद्द केलेले आरक्षण, ४० टक्के कमिशनचे सरकार याबरोबरच विकासाचे मुद्दे मांडत काँग्रेसने केलेले शक्तीप्रदर्शन भाजपपेक्षा सरस ठरले. राज्यभरातून निघालेली भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी वातावरण निर्मितीस पूरक ठरली. प्रति इंदिरा गांधी दिसणाऱ्या प्रियांका गांधींना ‘इंदराम्मा’ नावाने संबोधून मतदारांना आकर्षित करण्यात काँग्रेसला मोठे यश आले. शेवटच्या टप्प्यात बजरंग दलावर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या घोषणेचा उलट परिणाम होतो की काय, असे वाटले होते. परंतु मतदारांनी भाजपच्या ‘बजरंग बली की जय’कडे साफ दुर्लक्ष केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com