आईच्या दुधाची बँक; कोणाला होणार फायदा?, कोठे सुरू होणार बँक?

टीम ई-सकाळ
रविवार, 8 डिसेंबर 2019

मातृदूध दान करण्यासाठी महिला तयार आहेत. पण, त्याचं योग्य संकलन आणि साठवणूक होण्याचीही तितकीच गरज आहे.

बेंगळुरू : कर्नाटक सरकारनं बेंगळुरूमध्ये मातृदूध बँक उभारण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतलाय. आरोग्य विभागातील सूत्रांनी ही माहिती दिली असून, या मातृदूध बँकेसाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

लखनऊमध्ये घेणार प्रशिक्षण
पुण्यात गेल्या महिन्यात अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर इंजिनीअर महिलेनं सात लिटर मातृदूध दान केलं होतं. या घटनेची बरीच चर्चा झाली. मातृदूध दान करण्यासाठी महिला तयार आहेत. पण, त्याचं योग्य संकलन आणि साठवणूक होण्याचीही तितकीच गरज आहे. कर्नाटक सरकारनं यासाठी पुढाकार घेतला असून, डॉक्टर आणि इतर स्टाफला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांना लखऊनला पाठविण्यात येत आहे. लखनऊतील किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये मातृदूध बँक चालवली जात आहे. तेथे मातृदूध व्यवस्थापनाची संपूर्ण व्यवस्था आहे. बेंगळुरूमध्ये वाणी विलास हॉस्पिटलमध्ये ही मातृदूध बँक उभारली जाणार आहे. हे हॉस्पिटल बेंगळुरू मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटरशी संलग्न आहे. वाणी विलास हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मातृदूध बँकेसाठी बायोमेडिकल इंजिनीअर्सना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.  

आणखी वाचा - अमेरिकेतल्या इंजिनीअर तरुणीनं पुण्यात दान केलं मातृदूध

बालरोग विभागाचे प्रमुख, बायोमेडिकल इंजिनीअर्स आणि इतर स्टार लखनऊला भेट देणार असून, तेथे कसे काम चालते याची सर्व माहिती घेणार आहे. आमच्याकडे मातृदूध बँकेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचे सगळे साहित्य आले आहे. बँकेचे काम अंतिम टप्प्यात असून, ते लखनऊतील बँकेनुसारच केले जाणार आहे. 
- डॉ. गीता शिवमूर्ती,  वाणी विलास हॉस्पिटल

असं चालणार कामकाज!
ज्या महिलांकडे अतिरिक्त दूध आहे, त्यांच्याकडून या मातृदूध बँकेमध्ये दूध जमा करून घेतले जाणार आहे. ज्या महिलांच्या बाळाचा दु्र्दैवी मृत्यू झाला आहे किंवा ज्यांचे बाळ अतिदक्षता विभागात असल्यामुळं त्यांना बाळाला दूध पाजता येत नाही. त्यांच्याकडून दूध जमा करून घेतले जाणार आहे. हे दूध जन्मतः कमी वजनाच्या बाळांना किंवा ज्या बाळांच्या आईला दूध येत नाही, अशा बाळांना मोफत दिले जाणार आहे. काही घटनांमध्ये बाळा सुखरूप असतं. पण, आई आजारी असल्यामुळं तिला बाळाला दूध देता येत नाही. त्या बाळांनाही मातृदूध बँकेतून मोफत दूध दिले जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karnataka government to start brest milk bank at bengaluru