esakal | Positive Story - मित्राला उपाशी पाहून सुरू केली टिफिन सर्व्हिस; महिन्याचा टर्नओव्हर 3 लाख
sakal

बोलून बातमी शोधा

kashmir youth food delivery

भविष्यात या कामाला गती देऊन ते याचा अधिक विस्तार करु इच्छित आहेत.

Positive Story - मित्राला उपाशी पाहून सुरू केली टिफिन सर्व्हिस; महिन्याचा टर्नओव्हर 3 लाख

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

काश्मीरला स्वर्ग असं म्हटलं जातं. पण दहशतवादी कारवायांमुळे या नंदनवनाला सातत्याने त्रासाला सामोरे जावे लागते. या साऱ्या परिस्थितीत जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून एक तरुण आपल्या जीवाचे रान करतोय. त्याचं नाव आहे रईस अहमद. या 29 वर्षीय तरुणाच्या एका उपक्रमामुळे अनेकांच्या भुकेचा प्रश्न मिटला आहे. श्रीनगर मध्ये राहणाऱ्या या रईसला 'काश्मीरचा स्वीगी बॉय' या नावानेही ओळखलं जातं. याचं कारण असं की हा युवक लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना जेवण देण्याची सुविधा पुरवतो. 

आपल्या मित्रासाठी पहिल्यांदा पोहचवलं होतं जेवण
घरात तयार केलेल्या जेवणाची होम डिलीव्हरी करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात तेंव्हा आला जेंव्हा काश्मीरमधील कलम 370 हटवलं गेलं होतं. यावेळी लॉकडाऊन लागू केला गेला  होता, ज्यामुळे अनेकांच्या जेवणाचे हाल झाले होते. रईसने म्हटलं की, थंडीतील एक रात्र होती. तेंव्हा त्यांच्या एका मित्राचा रात्री 11 वाजता फोन आला. त्याने लॉकडाऊनमुळे सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं. भुकेने तो व्याकूळ झाला होता. त्याने मला विनंती केली होती की मी त्याच्यासाठी काही खाण्याची सोय करु शकतो का? आणि मग मी माझ्या मित्रासाठी लगेचच स्वयंपाकघरात जाऊन जेवण पॅक केलं आणि त्याला देण्यासाठी मी निघालो. या घटनेमुळेच मला प्रेरणा मिळाली की मी जेवण होम डिलीव्हरी करण्याचे काम करु शकतो. आणि मग रईसने फेब्रुवारीपासून लोकांच्या होम डिलीव्हरीच्या ऑर्डर घेणे सुरु केले. 

लॉकडाऊननंतर पुन्हा गती
मात्र फेब्रुवारीत सुरु केलेल्या या कामात पुन्हा मोठी अडचण आली. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू झाला आणि त्यांना आपलं काम बंद करावं लागलं. परत दिल्लीत राहणाऱ्या एका काश्मीरी व्यक्तीचा त्यांना कॉल आला. ते पेशाने डॉक्टर होते. त्यांना आपल्या आई-वडिलांसाठी जेवणाची होम डिलीव्हरी हवी होती. त्यांनी रईस यांच्यासोबत बातचित केली. रईस यांच्याकडे आधी 5 लोक काम करत होते मात्र कोरोनामुळे सगळं ठप्प झालं होतं. त्या पाच जणांचाही रोजगार गेला होता. मात्र, रईसने परत एकदा आपले काम सुरु केलं आहे. त्यांच्या एका आचाऱ्यासोबत ते हे काम करत आहेत. त्यांनी म्हटलंय की लवकरच आता ते इतरांनाही कामावर पुन्हा रुजू करणार आहेत. 

आम्ही कमीतकमी रक्कमेत लोकांना जेवण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कोरोनाच्या आधी जी थाळी 80 रुपयांची होती ती आता पॅकींग कॉस्ट वाढल्याकारणाने 100 रुपयांची झाली आहे. व्हेज आणि नॉन-व्हेज अशा दोन्ही  प्रकारच्या थाळी ते डिलीव्हर करतात. इतकंच नव्हे तर ते काश्मीरचे पारंपारिक अन्नदेखील डिलीव्हर करतात. रईस पीपीई किट घालून हि डिलीव्हरी करतात. काश्मीरमधील हॉस्पीटल्स, हॉस्टेल्स, क्वारंटाईन सेंटर्स अशा सर्व ठिकाणी ते आपले जेवण पोहोचवतात. या माध्यमातून त्यांचा महिन्याचा टर्नओव्हर तीन लाखांपर्यंतचा आहे.

ड्रिम प्रोजेक्टचा करणार विस्तार
भविष्यात या कामाला गती देऊन ते याचा अधिक विस्तार करु इच्छित आहेत. कोरोना महामारी नियंत्रणात आल्यावर ते जम्मू-काश्मीरच्या सर्व जिल्ह्यापर्यंत सहा महिन्यातंच पोहोचण्याचा त्यांचा इरादा आहे. या माध्यमातून अधिकाधिक लोकांच्या भुकेचा प्रश्न तर मिटेलच शिवाय अनेकांना रोजगारदेखील मिळेल, असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते TiFFIN aaw नावाचे एक ऍप लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यामाध्यमातून लोकांकडून डिलीव्हरी घेणे त्यांना सोपे जाईल.