केजरीवाल यांचा आज शपथविधी; शिक्षक, दिल्लीकरांना निमंत्रण

पीटीआय
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

रामलीला मैदानावर सोहळ्याची तयारी
रामलीला मैदानावर शपथविधीची तयारी सुरू असून, सकाळी दहा किंवा बारा वाजता शपथविधीचा सोहळा होऊ शकतो. या वेळी जुन्या सरकारमधील मंत्रीदेखील शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. व्यासपीठावर ५० जण उपस्थित राहणार आहेत. त्यात शिक्षक, बसचालक, बस मार्शल, शेतकरी आणि डॉक्टर यांचा समावेश असेल. या माध्यमातून केजरीवाल हे आप पक्षाचे नाही, तर सामान्य नागरिकांचे सरकार शपथ घेत असल्याचा संदेश देऊ इच्छित आहेत.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल उद्या (ता. १६) तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ७० पैकी ६२ जागा जिंकून दणदणीत यश मिळवले आहे. या  शपथविधी सोहळ्याच्या व्यासपीठावर सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ५० जणांना स्थान दिले जाणार आहे. तसेच, शिक्षकांनाही उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केजरीवाल यांनी शनिवारी रात्री आम आदमीच्या नवनिर्वाचित आमदारांबरोबर दिल्लीच्या विकासकामांवर चर्चा केली. दिल्लीतील कामांबाबत प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. दिल्लीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने रोडमॅप तयार करण्यात येणार आहे. केजरीवाल आणि त्यांचे सहकारी रविवारी सकाळी दहा वाजता शपथ घेणार आहेत. 

इंडियन उसेन बोल्टला लॉटरी; ट्रेनिंगची तयारी सुरू!

दरम्यान, भाजपचे नवनिर्वाचित आमदार विजेंदर गुप्ता यांनी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले असून, सरकारी शाळेतील शिक्षकांना शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याबाबत घातलेले बंधन मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. गेल्या विधानसभेला विरोधी पक्षनेते असणारे गुप्ता यांनी म्हटले, की आपने काढलेले पत्रक हे हुकूमशाही दाखवते. या आदेशानुसार १५ हजार शिक्षक आणि अधिकारी सोहळ्यास उपस्थित राहू शकतात. दरम्यान, दिल्ली चर्चा आणि आयोगाच्या अध्यक्षा जास्मिन शहा यांनी गुप्ता यांच्या प्रतिक्रियेला आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले, की गेल्या पाच वर्षांत दिल्लीतील शैक्षणिक बदलाचे शिल्पकार म्हणून शिक्षकांकडे पाहिले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kejriwal today invitation to sworn in teacher