Arvind Kejriwal: हुकूमशाहीपासून देश वाचवू; तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल यांचा लढ्याचा निर्धार

बहुचर्चित कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने आज १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर सायंकाळी तिहार कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsakal

नवी दिल्ली : बहुचर्चित कथित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने आज १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर सायंकाळी तिहार कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. या देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे असून तिच्याविरोधात लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. केजरीवालांच्या स्वागतासाठी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर मोठी गर्दी केली होती. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करता यावा म्हणून आपल्याला जामीन दिला जावा अशी विनंती केजरीवाल यांनी न्यायालयाकडे केली होती.

न्यायालयाने त्यांची ही विनंती मान्य केली. केजरीवाल यांनी ५ जूनपर्यंत जामीन मागितला होता मात्र त्यांनी २ जून रोजी आत्मसमर्पण करावे असे निर्देश न्यायालयाने दिले. या ताज्या निकालाचे आम आदमी पक्षाने स्वागत केले असून भाजपने मात्र केजरीवाल हे पुन्हा तुरुंगात जातील असा टोमणा मारला आहे.

केजरीवाल हे जामिनावर तुरुंगातून बाहेर आले असले तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्री या नात्याने कार्यालयीन कामकाज मात्र करता येणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णयही घेता येणार नाहीत. ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मी आभार मानतो. आज त्यांच्यामुळेच मी तुमच्यासमोर उभा आहे. आपल्याला हुकूमशाहीपासून देश वाचवायचा आहे,’’ असे केजरीवाल यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

‘निवडणुकीत प्रचार करणे हा मूलभूत अथवा घटनात्मक अधिकार नाही. केजरीवाल यांना जामीन देण्यात आला तर तुरुंगात बंद असलेले इतर लोक सुद्धा अशाच प्रकारे जामीन मागू लागतील,’ असे सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते. ‘निवडणूक ही पाच वर्षांतून एकदाच येते. आता २० दिवस जामीन देण्यात आल्याने फार काही फरक पडणार नाही,’ अशी टिपणी करीत सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांचा जामीनअर्ज मंजूर केला. तत्पूर्वी याआधी झालेल्या सुनावणीदरम्यानच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याचे संकेत दिले होते. जामीन देण्यात आला तरी केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहू शकणार नाहीत, अशी टिपणी त्यावेळी न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने केली होती.

‘ईडी’चा असाही दावा

‘राजकीय नेत्यांना प्रचार करण्यासाठी जामीन देण्याची परंपरा नाही. तुरुंगात राहून निवडणूक लढविल्याची व ती जिंकल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला स्वत:च्या प्रचारासाठी देखील अंतरिम जामीन दिला जात नाही,’ असे मत ‘ईडी’ने मांडले होते. मात्र खंडपीठाने हा युक्तिवाद बाजूला सारत केजरीवाल यांना दिलासा दिला. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने गत २१ मार्च रोजी केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. तेव्हापासून ते तिहार तुरुंगात होते.

Arvind Kejriwal
Liquor Policy Case : ‘आप’चे दुर्गेश पाठक यांची ईडी चौकशी

काँग्रेसकडूनही निकालाचे स्वागत

केजरीवाल यांना देण्यात आलेल्या जामिनाचे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी स्वागत केले आहे. ‘‘केजरीवाल यांच्याप्रमाणे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्याची गरज आहे,’’ असे मत काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले. ‘‘ केजरीवाल यांना न्याय मिळाला असून देशातील जनता ४ जून रोजी केंद्रातील संविधानविरोधी सरकार उलथवून टाकेल,’’ असे काँग्रेसचे नेते कन्हैय्याकुमार यांनी नमूद केले. केजरीवाल यांच्या सुटकेनंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही एकच जल्लोष केला. दुसरीकडे केजरीवाल यांना प्रचारासाठी जामीन मिळाला आहे पण १ जूननंतर ते पुन्हा तुरुंगात जातील, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com