'खासदार खैरे अजूनही नगरसेवकाच्या भूमिकेत'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

अर्धवट माहितीच्या आधारे आमचा नगरसेवकही बोलत नाही, मात्र चंद्रकांत खैरे खासदार असताना काहीही आरोप करतात. खैरे जरा खासदारासारखे वागा असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.23) शहर बसच्या उद्घाटनप्रसंगी काढला. विशेष म्हणजे यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

औरंगाबाद : अर्धवट माहितीच्या आधारे आमचा नगरसेवकही बोलत नाही, मात्र चंद्रकांत खैरे खासदार असताना काहीही आरोप करतात. खैरे जरा खासदारासारखे वागा असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.23) शहर बसच्या उद्घाटनप्रसंगी काढला. विशेष म्हणजे यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रविवारी ठाकरे यांच्या हस्ते शहर बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. दोन दिवसापूर्वी खासदार खैरे यांनी हरिभाऊ बागडे यांच्यावर कषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्याचा वचपा बागडे यांनी ठाकरे यांच्या समोर काढला. ते म्हणाले, खासदार अजूनही नगरसेवकाच्याच भुमिकेत आहेत, त्यांनी त्यातुन बाहेर यावे. अर्धवट माहिती आधारे आमचा नवीन नगरसेवकही बोलत नाही.

महापालिकेला राज्य आणि केंद्र सरकारने मिळून अडीचशे ते पावणे तीनशे कोटी रुपये दिले परंतु ते अद्यापही खर्च करण्यात आले  नाहीत.  शहराचा विकास आराखडा तयार नाही. त्यामुळे आदित्यजी या  शहराकडे तुम्ही लक्ष द्या, असे सांगत बागडे यांनी शिवसेना नेत्यांना फैलावर घेतले. कै. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची निविदा महापालिकेला का काढता आली नाही असा सवालही त्यांनी केला.

योजना फक्त माझ्याच 
शहर बस, भूमिगत गटार  योजनेचा मी यजमान आहे. योजनेत कुणाचे श्रेय नाही. ते फक्त माझेच आहे, महापालिकेचेही नाही, असा दावा खासदार खैरे यांनी केला. खैरे यांच्या प्रयत्नांमुळे या योजना आल्या नाहीत तर यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचाही तेवढाच मोठा वाटा आहे, असे भाजपचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले.

बाईटसाठी आमच्या मागे पळता
खासदार खैरे पत्रकार, वाहिन्यांच्या केमरामनवर उखडले. ठाकरे व्यासपीठावर आले असता, आता  बाईटसाठी आमच्या पाठीमागे धावत आहात. आता मी देणार नाही, असे खैरे म्हणाले. माजी खासदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, ऋषिकेश जैस्वाल, किरण तुपे यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण निवळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khaire still plays a corporators role says Haribhau Bagde