जिनपिंग यांच्याशी चर्चेसाठी किम चीन दौऱ्यावर 

पीटीआय
बुधवार, 20 जून 2018

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरील ऐतिहासिक बैठकीत अण्वस्त्रमुक्त होण्याचे मान्य केलेले उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन हे चीन दौऱ्यावर आले आहेत. ट्रम्पभेटीनंतर पुढील कृती ठरविण्यासाठी ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. 
 

बीजिंग : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरील ऐतिहासिक बैठकीत अण्वस्त्रमुक्त होण्याचे मान्य केलेले उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन हे चीन दौऱ्यावर आले आहेत. ट्रम्पभेटीनंतर पुढील कृती ठरविण्यासाठी ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. 

अमेरिका-उत्तर कोरिया समझोता होणे आणि चीन-अमेरिका व्यापारयुद्ध भडकणे, या पार्श्‍वभूमीवर किम यांचा हा चीन दौरा आहे. गेल्या तीन महिन्यांत ते तिसऱ्यांदा येथे आले आहेत. किम आणि जिनपिंग यांच्यात नक्की काय चर्चा होणार, याबाबत दोन्ही देशांकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही. योग्य वेळी निवेदन प्रसिद्ध करू, असे पत्रकारांना सांगण्यात आले आहे. मात्र, उत्तर कोरियावरील निर्बंध उठविण्याचा मुद्दा, अण्वस्त्रमुक्तीची प्रक्रिया, अमेरिकेबरोबरील संबंध, व्यापार या मुद्यांवर दोन्ही नेते चर्चा करण्याची शक्‍यता आहे. उत्तर कोरियाने गेल्या काही काळात सातत्याने अण्वस्त्र चाचणी घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्यावर बरीच निर्बंधे घातली होती. अण्वस्त्रमुक्तीच्या निर्णयानंतर त्यांच्यावरील ही निर्बंधे उठवावीत, अशी मागणी रशियाने केली आहे.

चीनदेखील याच सुरात सूर मिळविण्याची शक्‍यता आहे. ट्रम्प यांनी मात्र अमेरिकेने घातलेली निर्बंध अद्याप उठविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिनपिंग यांची भेट घेतल्यावर किम यांचे मन बदलते, असे ट्रम्प पूर्वी एकदा म्हटले होते. या वेळीही ट्रम्प यांच्या मनात तीच भीती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kim Jong Un’s secret visit to China