
कृष्ण जन्मभूमी खटला : शाही इदगाह मशीद हटवण्याची याचिका मंजूर
मथुरा : मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद वादावरही न्यायालयात सुनावणी होणार असून, मथुरा जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. दिवाणी न्यायाधीशांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे कृष्णजन्मभूमीला लागून असलेल्या शाही ईदगाह मशीद (Shahi Idgah Masjid) हटवण्याच्या याचिकेवर न्यायालयीन कामकाजाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Krishna Janmabhoomi case )
मथुरा जिल्हा न्यायालयात कृष्ण जन्मभूमी इदगाह मशीद वादाची सुनावणी 6 मे रोजी पूर्ण झाली होता. त्यामध्ये सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. याचिकेत श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाची 13.37 एकर जमीन परत मिळावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. तसेच यामध्ये सुमारे चारशे वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या आदेशाने त्यातील मोठ्या भागावरील मंदिर पाडल्यानंतर त्या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करून केशवदेव टिळा आणि शाही ईदगाह मशीद बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.