चोरीला गेलेली गाडी मिळाल्यानंतर चाहत्यानं मागितली पार्टी; रिप्लायमध्ये कुमार विश्वास यांचा केजरीवालांवर निषाणा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

कुमार विश्वास यांनी पक्षाला आणि राजकारणाला रामराम केला असला तरीही अनेकदा काव्यसंमेलनात किंवा इतर कार्यक्रमांमध्ये ते राजकीय मुद्यांवरून  टीका करतात.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचा वेगळा असा एक चाहतावर्ग आहे. अनेक विषयांवर ते मिश्किल भाष्य करत असतात.  सध्या कुमार विश्वास हे त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या चोरीमुळे चर्चेत आहेत. कुमार विश्वास यांची फॉर्च्युनर फेब्रुवारी महिन्यात चोरीला गेली होती. आता कार चोरणाऱ्याला पकडण्यात आलं असून कुमार विश्वास यांना कार परत मिळाली आहे.

चोरीला गेलेली कार मिळाल्याची माहिती कुमार विश्वास यांनी ट्विटरवरून त्यांच्या चाहत्यांना दिली होती. यानंतर चाहत्यांनी कुमार विश्वास यांचे अभिनंदन केलं होतं. यातच एका चाहत्यानं या आनंदाच्या क्षणी पार्टी तो बनती है म्हटलं होतं. चाहत्याच्या कमेंटला उत्तर देताना कुमार विश्वास यांनी पुन्हा एकदा आम आदमी पार्टीवर निषाणा साधला आहे. 

दिल्लीत जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात अण्णा हजारे यांच्या साथीला असलेल्या लोकांमध्ये कुमार विश्वास, केजरीवाल हे होते. केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची स्थापना करून दिल्लीत सत्ता मिळवली. पण काही वर्षांतच पक्षात फूट पडली. त्यानंतर कुमार विश्वास यांनी पक्षाला आणि राजकारणाला रामराम केला असला तरीही अधून मधून राजकीय मुद्यांवरून बऱ्याचदा टीका करतात.

फेब्रुवारी महिन्यात चोरी झालेली गाडी कुमार विश्वास यांना मिळाल्यानंतर त्यांनी ट्विट करताना चोराच्या नावासह ट्विट केलं होतं. चोराच्या कौशल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांचे प्रयत्न भारी पडले असं कुमार विश्वास यांनी म्हणताना आयपीएस नैथानी यांच्यासह टीमचे आभार मानले होते. यावर एका युजरनं त्यांना पार्टी तो बनती है असं म्हटलं होतं. तेव्हा उत्तर देताना कुमार विश्वास म्हणाले की, पार्टी बनाई थी, चुर गयी. यातून कुमार विश्वास यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवर निषाणा साधला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kumar vishwas target aam admi party when fan ask for party