कुमारस्वामी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भेटीला; राजकीय तर्कवितर्कांना उधाण

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 September 2020

कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली.

बंगळूर- कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. मात्र, या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे राज्यात तर्कवितर्कांना एकच उधाण आले.

कुमारस्वामी यांनी येडियुरप्पा यांच्या ‘कृष्णा’ या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे हे निवासस्थान त्यांचे कार्यालयही आहे. ही भेट साधारणपणे २० मिनिटे चालली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, की राज्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्याठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विशेषत: धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदार मंजुनाथ यांच्या दासराहल्ली मतदारसंघात पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे, मंजुनाथ यांच्याबरोबर येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केली. या मतदारसंघासाठी आणखी निधी मंजूर करून दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली.

पोस्टातील 'या' योजनेत करा गुंतवणूक आणि कमवा लाखो रुपये!

पाहूया, कुणाची नावे उघड होतात

कर्नाटकमध्ये सध्या अमली पदार्थांचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या प्रकरणातील दोषींवर, ते कितीही उच्चपदस्थ असले तरी कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे, तपासात कुणाची नावे पुढे येतात, हे पाहूया, असेही कुमारस्वामी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kumaraswamy visit to Chief Minister Yeddyurappa Political debates abound in Karnataka