
कुंभ मेळ्यामध्ये नदी पात्रात जावून पवित्र गंगा स्नान करणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक भाविकाने केवळ तीन डुबक्या मारुन बाहेर पडावे, अशी योजना आखण्यात आली आहे.
हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीदिवशी सुमारे सात लाख भाविकांनी हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर पवित्र स्नान केले, अशी माहिती उत्तराखंडच्या माहिती विभागाने दिली आहे. आरतीवेळी धार्मिक विधीमध्येही 7 लाख 11 हजार भाविकांनी सहभाग घेतला.
दरम्यान, कुंभमेळ्यात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 974 जणांवर कारवाई केल्याची माहिती राज्य सरकारने दिली. कुंभमेळ्यात भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तराखंड दहशतवादविरोधी पथक, प्रादेशिक सशस्त्र पोलीस व केंद्रीय निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, पाच बॉम्ब शोधक पथकेही हरिद्वारमध्ये तैनात केली आहेत. बिनतारी दळणवळण यंत्रणेबरोबरच संपूर्ण कुंभमेळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
12 वर्षांनी होणारा कुंभमेळ्याचे देशभरातील भाविकांना आकर्षण असते. मात्र, यंदा कोरोनामुळे साडेतीन महिन्यांऐवजी 48 दिवसच कुंभमेळा होईल. त्यामुळे 27 एप्रिलला कुंभमेळ्याची सांगता होईल.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास योजना
कुंभ मेळ्यामध्ये नदी पात्रात जावून पवित्र गंगा स्नान करणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक भाविकाने केवळ तीन डुबक्या मारुन बाहेर पडावे, अशी योजना आखण्यात आली आहे. यामुळे भाविक अधिक काळ नदीपात्रात थांबणार नाहीत. गर्दी पांगवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज करण्यात आली असून पोलिस यावर नजर ठेवून राहणार आहेत. गंगा नदी पात्रात स्नान करणाऱ्या भाविकांना तीन डुबक्या मारुन बाहेर पडावे लागेल. या भागात पोलिस कर्मचारी भाविकांना याप्रकारच्या सूचनाही देणार आहेत.