गोव्यात शिरले समुद्राचे पाणी; पणजी जलमय, जनजीवन ठप्प (व्हि़डिओ)

अवित बगळे 
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

क्यार चक्रीवादळामुळे सध्या गोव्याच्या किनारपट्टीवर 80 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत.

पणजी :  मुसळधार पाऊस, सोसट्यानं वाहणारे वारे आणि उधाण आलेल्या दर्यानं आज, गोव्याचं जनजीवन विस्कळीत करून टाकलंय. अरबी समुद्रात उसळलेल्या क्यार चक्रीवादळामुळे गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. गोव्यात दिवाळी निमित्त शाळांना सुटी आहे. पण, सरकारी कार्यालये खासगी कार्यालयांमध्ये अतिशय तुरळक मनुष्यबळ दिसत आहे. 

क्यारची तीव्रता वाढणार; महाराष्ट्रची दिवाळी पावसातच

काय घडतंय गोव्यात?
क्यार चक्रीवादळामुळे सध्या गोव्याच्या किनारपट्टीवर 80 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. पणजीसह संपूर्ण गोव्यात पावसाचा जोर असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहेत. पणजी शह अक्षरशः जलमय झाले असून, पावसाचा जोर काही थांबण्यास तयार नाही. अरबी समुद्र 100 मीटर पुढे सरकला आहे. अर्थात गोव्यातील काही भागातच समुद्र पुढं सरकला आहे. प्रमुख्याने बागा, कलंगुट, रेइश मगूश येथे समुद्र जास्त पुढे सरकल्याचे दिसत आहे. वादळी वाऱ्यामुळे गोव्यात विशेषतः पणजी परिसरात झाडे उन्मळून पडली आहे. काल रात्रीपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. मुळात गोव्यात चिंचोळे रस्ते असल्यामुळे झाड पडल्यास तेथून वाहतूक बंद होते. सध्या किनारपट्टीच्या भागात ही परिस्थिती दिसत आहे. 

क्यारची तीव्रता वाढणार; महाराष्ट्रची दिवाळी पावसातच

तिलारी धरणातून सोडणार पाणी
गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातील तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्रकडून गोवा सरकारला देण्यात आली आहे. त्यामुळे शापोरा नदीचे पाणी वाढणार आहे. परिणामी साळा आणि इब्रामपूर मध्ये  पुराचा इशारा देण्यात आला असून, तेथे गोवा सरकारने रात्रीपासून जीवरक्षक तैनात केले  आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kyar cyclone impact on goa heavy rains in panjim