ED Inquiry : लालूप्रसाद यांची दहा तास ‘ईडी’ कार्यालयात चौकशी

नोकरीसाठी जमीन गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव हे सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे गेले.
Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadavsakal

पाटणा - नोकरीसाठी जमीन गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव हे सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे गेले. त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली.

यावेळी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने आरजेडीचे कार्यकर्ते गोळा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लालू आज सकाळी अकराच्या सुमारास ‘ईडी’च्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत कन्या मिसा भारती याही उपस्थित होत्या. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केल्यानंतर लगेचच लालूंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

‘ईडी’च्या कार्यालयात जाण्यापूर्वी मिसा भारती म्हणाल्या, ‘तपास संस्थांचे बोलावणे आल्यानंतर आम्ही चौकशीला हजर राहतो. आम्ही अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे. लालूंना आता स्वतःहून चौकशीला येणे शक्य नसल्याने मी स्वतः त्यांना घेऊन आले आहे.’

लालू यांच्या दुसऱ्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ‘ईडी’वर टीका केली आहे. मिसा भारती यांनी लालूंसोबत एका साहाय्यकाला देखील चौकशीप्रक्रियेदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती पण अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावल्याचे आचार्य यांनी म्हटले आहे.

लालूंची अवस्था माहिती असून देखील ‘ईडी’चे अधिकारी ऐकायला तयार नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली आहे. दरम्यान पत्रकारांनी यावेळी मिसा भारती यांना नितीश यांच्या भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी त्यावर भाष्य करायला नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com