पर्यावरणाच्या हानीस मोठे देश कारणीभूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi
पर्यावरणाच्या हानीस मोठे देश कारणीभूत

पर्यावरणाच्या हानीस मोठे देश कारणीभूत

नवी दिल्ली - जागतिक तापमानवाढ व पर्यावरणाच्या हानीस जगातील मोठे (विकसित) देश सर्वाधिक कारणीभूत असून यात भारताचा वाटा नगण्य आहे. मात्र तापमानवाढ रोखण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये भारताने भरीव व ‘बहुआयामी’ वाटा उचलला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. श्री सदगुरू यांच्या ‘ईशा फौंडेशन’च्या वतीने सुरू झालेल्या ‘मिट्टी बचाव’ यात्रा दिल्लीत पोहोचली. त्यानिमित्त व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. गंगेच्या किनाऱ्यावर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एका भव्य कॅरिडॉरची निर्मिती केली जाईल, असेही पंतप्रधानांनी जाहीर केले. सद्गुरू यांची ‘मिट्टी बचाव’ जागरूकता यात्रा २७ देशांचा प्रवास करून आज ७५ व्या दिवशी भारतात पोहोचली. यानिमित्त विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले.

जमिनीचा किंवा मातीचा ‘जिवंतपणा’ कायम राहावा यासाठी मातीतील रसायनांचे प्रमाण नगण्य करणे, मातीतील जीवजंतूंचे (सॉईल ऑरगॅनिक मॅटर) रक्षण, मातीची आर्द्रता कायम ठेवण्यासाठी आवश्यक पाण्याचे प्रमाण, भूजलाचे प्रमाण वाढविणे व वाढती जंगलतोड रोखून जमिनीची धूप थांबविणे या ‘पंचसूत्री’च्या अंमलबजावणीला केंद्राने गती दिली आहे, असे सांगून पंतप्रधानांनी, मृदा आरोग्य कार्ड, कडुलिंबाचे आवरण असलेले नीम कोटेड युरिया खताचे उत्पादन वाढविणे, पावसाचे पाणी वाचविण्याची जल जीवन मिशन योजना यांचाही उल्लेख केला.

ते पुढे म्हणाले की, पर्यावरण रक्षणात भारताने बहुआयामी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतकालखंडात भारताने प्रवेश केला आहे. या काळात या प्रकारची जनआंदोलने महत्त्वाची ठरतात. मागील आठ वर्षांत केंद्र सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यात कोणत्या ना कोणत्या रूपात पर्यावरण संरक्षणाचा आग्रह आहे. नमामी गंगे, स्वच्छ भारत, ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’वर बंदी आदी अनेक योजनांवर पर्यावरण रक्षणाच्या संदेशाची छाप आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सौर महासंघाच्या स्थापनेतही भारताने नेतृत्व करण्याची भूमिका घेतली. २०७० पर्यंत ‘नेट झीरो‘ चे लक्ष्य भारताने समोर ठेवले आहे. आमचे सौर ऊर्जा उत्पादन आज १८ टक्क्यांनी वाढले आहे. ‘हायड्रोजन मिशन’, ‘सर्क्युलर इकॉनॉमी पॉलिसी’ अशा अनेक क्षेत्रांतील सहभाग आमची निष्ठा दाखवितो. मृदा आरोग्य कार्डांमुळे देशातील शेतकऱ्यांंना मोठा लाभ झाला असून यासाठीच्या जनभागीदारी मोहिमेमुळे शेतकऱयांचा उत्पादन खर्च आठ ते १० टक्क्यांनी वाचला व उत्पादनात पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाली.

विदेशी चलनाची बचत

पेट्रोलमध्ये १० टक्क इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट भारताने पाच महिने आधीच गाठल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की २०१४ पर्यंत भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण केवळ १.५ टक्के होते. आज ते वाढल्याने त्याचे अनेक फायदेही झाले आहेत. यामुळे २७ लाख टन कार्बन उत्सर्जन टळले आहे. शिवाय या एका उपायामुळे ४१ हजार कोटी रुपयांचे विदेशी चलनाचीही बचत भारताने केली आहे.

Web Title: Large Countries Cause Environmental Damage Prime Minister Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top