esakal | Video: कोरोनाचं भय नाही; कुंभमेळ्यात गंगा आरतीवेळी तोबा गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

haridwar kunbha mela uttarakhand

Video: कोरोना गेला उडत; कुंभमेळ्यात गंगा आरतीवेळी तोबा गर्दी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- हरिद्वार इथं कुंभमेळा सुरु असून शाही स्नान होत आहेत. यामध्ये लाखो साधू, महंत आणि भाविक सहभागी होताहेत. बुधवारी रात्री होत असलेल्या गंगा आरतीवेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. हजारोंच्या संख्येने भाविक आरतीसाठी जमले होते. भाविक एकमेकांना चिटकून उभे ठाकले होते. शिवाय अनेकांनी मास्कही न घातल्याचं पाहायला मिळाला. कोरोना नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचं दृश्य होतं. कुंभमेळा आयोजित केल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढेल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. असे असतानाही कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले असून लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे. हरिद्वार कुंभमेळा 30 एप्रिलपर्यंत सुरु असेल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कुंभमेळा लवकर संपवला जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण, यावर आता पडदा पडला आहे.

सचिव शैलेश बगोली यांनी सांगितलं की, कुंभमेळा 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. याचा कालावधी कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. सूत्रांच्या माहितीनुसार कोरोना संसर्गाच्या वेगानुसार सरकार यावर निर्णय घेऊ शकते. डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितलं की, कुंभचे मुख्य स्थान बुधवारी संपलं आहे. त्यामुळे फोर्स आता दोन दिवसात माघारी जाईल. मुख्य स्नान झाल्याने आता गर्दी कमी होईल, असं सांगण्यात येत आहे.

कुंभमेळ्यात 10 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या तब्बल 1 हजार 86 इतकी आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासात एकूण 1925 नवीन रुग्ण सापडले. यात डेहराडूनमध्ये 775, हरिद्वारमध्ये 594 नव्या रुग्णांचा समावेश आहे. 12 एप्रिलला दुसऱ्या शाही स्नानासाठी जवळपास 30 लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. हरिद्वारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 66 हजार 203 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.