
बिहारमध्ये कार्तिकेय सिंह यांनी कायदा मंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकारण चांगलेच तापले होते. बिहारचे कायदा मंत्री कार्तिकेय सिंह हे राजीव रंजन अपहरण प्रकरणातील आरोपी आहेत. ज्यांच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. ते 16 ऑगस्टला हजर होणार होते, मात्र त्यावेळी ते शपथ घेत होते. कार्तिकेय सिंग यांनी कोर्टासमोर शरणागती पत्करलेली नव्हती किंवा जामिनासाठी अर्जही केलेला नव्हता. यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करण्यात आली होती.
बिहारमधील याच राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पडदा टाकला आहे. अपहरणाच्या आरोपांनी घेरलेल्या कार्तिकेय सिंह यांच्याकडून कायदा मंत्रालयाची जबाबदारी आता काढून घेतली आहे. आता ते ऊस आणि उद्योग विभागात काम करणार आहेत. त्याचबरोबर कायदा मंत्रालयाची जबाबदारी आता शमीम अहमद यांच्याकडे असणार आहे. शमीम अहमद हे यापूर्वी बिहार सरकारचे ऊस उद्योग मंत्री होते.
कार्तिकेय कुमार सिंह यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे आणि याच कारणास्तव कोर्टाने त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. 16 ऑगस्ट रोजी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. कार्तिकेय सिंह यांनी शरणागती पत्करण्याऐवजी त्याच दिवशी कायदामंत्री म्हणून शपथ घेतल्याने वाद निर्माण झाला होता.