हाथरस प्रकरणी जे झालं त्याने भाजपची प्रतिमा डागाळली- उमा भारती

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 2 October 2020

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 20 वर्षीय दलित मुलीवर झालेला कथीत बलात्कार आणि क्रूर अत्याचाराप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 20 वर्षीय दलित मुलीवर झालेला कथीत बलात्कार आणि क्रूर अत्याचाराप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांनी छुप्या पद्धतीने पीडितेचा अंत्यसंस्कार केल्यामुळे देशभरातून संतापाची लाट आहे. विरोधक पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले असता, त्यांना रोखण्यात आले. तसेच माध्यमांनाही पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी विरोधक आणि माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू द्यावे, अशी विनंती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. 

'कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन' म्हणणारा भाजप नेता...

उभा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांनी हाथरस प्रकरणावर भाष्य केलं. योगी आदित्यनाथ यांनी हाथरस येथील पोलिसांना परत बोलवावे, असं त्या म्हणाल्या आहेत. माध्यमांना आणि राजकीय नेत्यांना, विरोधकांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू द्यावे अशी विनंती त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. तसेच ज्या प्रकारे घाईगडबडीत पीडितेचा अंत्यसंस्कार करण्यात आला, यावर त्यांनी टीका केली आहे. 

हाथरसची घटना आणि पोलिसांच्या कारवाईवर उपस्थित होणारे प्रश्‍नचिन्ह पाहता उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार आणि भाजपची प्रतिमा डागाळली आहे, असे मत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी व्यक्त केले आहे. ट्विटरवर त्यांनी म्हटले की, योगी आदित्यनाथ यांनी पारदर्शकपणे राज्याचा कारभार केला असून त्यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आताच अयोध्या येथे राम मंदिराचे भूमिपूजन केले, परंतु हाथरसच्या घटनेने पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. आपण सध्या कोरोना वॉर्डमध्ये असून मी अस्वस्थ आहे. मी जर पॉझिटिव्ह नसले असते तर हाथरसला गेले असते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, विरोधकांनी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना रस्त्यातच अडवण्यात येत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना ताब्यात घेण्यात आले. शिवाय राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. राहुल आणि प्रियांका यांच्या विरोधात महामारी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माध्यमांनाही पीडितेच्या कुटुंबीयांशी भेटण्यास मज्जाव करण्यात येत आहे. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा याठिकाणी तैनात केला आहे. रस्त्यावर बॅरिकेडिंग लावण्यात आली आहे. 

कोरोना काळात घर विकत घेण्याची चांगली संधी?

योगी सरकारच्या आदेशानंतर पोलिसांनी हाथरसला जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. माध्यमांनाही त्या ठिकाणी जाण्यापासून रोखले आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही मनाई करण्यात आली आहे. गावात कोणालाच प्रवेश दिला जात नाही. हाथरस पोलिसांनी प्रसारमाध्यमे, राजकीय प्रतिनिधी आणि इतर लोकांना गुरुवारपासूनच गावात प्रवेशबंदी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे एक प्रतिनिधीमंडळ हाथरस जिल्ह्याच्या सीमेवर रोखण्यात आले. ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let Politicians and media Meet hathras victim Family Uma Bharti To Yogi Adityanath