कोरोना वाढतोय, सावध रहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोना वाढतोय, सावध रहा

नवी दिल्ली - महाराष्ट्रासह काही राज्यांत कोरोनाच्या पुन्हा वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांचे महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून आगामी सणासुदीच्या काळात विशेष खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज सकाळपर्यंतच्य २४ तासांत (शुक्रवारी) २०२४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली व ५ रुग्णांचा मृत्यू झाला. याच दिवसात २१९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ११९०६ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापावेतो ७८ लाख ९५ हजार ९५४ जणांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. दरम्यान, राज्यातील पुन्हा वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य सरकारला पत्र लिहून खबरदारीच्या सूचना घेण्याचे निर्देश दिले आहेत.

चाचण्या व अन्य आरोग्य उपाययोजनांचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यांत घटले आहे, १० टक्क्यांपेक्षा जास्त सक्रिय रूग्णसंख्या पुन्हा कोणत्या भागांत आढळत आहे, याचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील उपाययोजना त्वरित सुरू कराव्यात, असे पत्रात म्हटले आहे. आगामी काळात सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठात गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना उपाययोजनांचे प्रमाण वेळीच वाढवावे असेही पत्रात म्हटले आहे. दरम्यान, देशपातळीवर मागच्या तीन दिवसांपासून वाढत जाणारी कोरोना रुग्णसंख्या गेल्या २४ तासांत किंचित कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार शनिवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत देशात आकडेवारीनुसार, देशात १९ हजारांहून अधिक (१९,४०६) नव्या रुग्णांची नोंद झाली व ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

बूस्टर लसीकरणात तिपटीने वाढ

मुंबई - गेल्या पंधरा दिवसांत बूस्टर डोस घेण्याच्या संख्येत जवळपास २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १ ते १५ जुलै या कालावधीत फक्त सात टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला होता. लसीकरणाच्या आकडेवारीनुसार, १ जुलै ते ५ जुलैदरम्यान १८ ते ५९ वर्षे आणि ६० वर्षांवरील ४८ हजार ६२४ लाभार्थींनी बूस्टर डोस घेतला होता जो १६ जुलै ते ३१ जुलैदरम्यान वाढून १ लाख ८९ हजार ५३० वर पोहोचला.

याचे अधिकाऱ्यांनी केंद्राच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवासाठी ७५ दिवसांच्या मोफत लसीकरण मोहिमेला दिले आहे. बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कार्यालये, मॉल आणि साप्ताहिक बाजारांव्यतिरिक्त गणेश मंडळे येथे लसीकरण मोहीम राबवत आहोत. शिवाय, सर्व जिल्ह्यांना जवळपास कालबाह्य होणाऱ्या सर्व लशींचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या ज्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लसी कालबाह्य होणार नाहीत, असे राज्य आरोग्य विभागातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. आता लोकांना लसीच्या दुष्परिणामांची भीतीदेखील नाही. कारण, त्यांना अधिक चांगल्या प्रकारे माहिती दिली जाते. शिवाय, सरकारी रुग्णालयात ही लस मोफत दिली जाते. त्यामुळे नागरिक आता बूस्टर घेण्यासाठी गर्दी करत असल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे.

बूस्टर डोससाठी पुढे येणाऱ्या लाभार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, महाराष्ट्रातील सणासुदीचा विचार करता येत्या काही दिवसांत संख्या आणखी वाढेल, अशी आशा आहे.

– डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी.

Web Title: Letter From Union Health Secretary To Maharashtra Health Secretary Corona Update News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top