नवजात बालकांना श्‍वास देणारे ‘सान्स’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवजात बालकांना श्‍वास देणारे ‘सान्स’

नवजात बालकांना श्‍वास देणारे ‘सान्स’

गुवाहाटी : नवजात बालकांचा मृत्युदर कमी करणारे ‘सान्स’ नावाचे उपकरण प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी ठरल्यानंतर आता आसाम सरकारने याचा नियमित रुपाने वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळूर येथील स्टार्टअप कंपनीने विकसित केलेले हवेच्या दाबावर आधारित असणारे जीवनदायी उपकरण आसाममधील सर्व रुग्णालयात वापरण्यात येणार आहे. सान्स ही एक पोर्टेबल नियोनेटल कंटिन्यूअस पॉझिटिव्ह एअर प्रेशर (सीपीएपी) प्रणाली आहे. हे तंत्र रुग्णालयात नवजात शिशूंना श्‍वास घेण्यासाठी मदत करते. एवढेच नाही तर प्रवासादरम्यान देखील या उपकरणाचा वापर करता येऊ शकतो.

बंगळूरचे स्टार्टअप इनअॅक्सेल टेक्नॉलॉजिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात काही नवजात बालकांवर प्रायोगिक तत्त्वावर या उपकरणाचा वापर करण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम पाहावयास मिळाले. त्यानंतर ५० पेक्षा अधिक ‘सान्स’उपकरण हे आसामच्या वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयात बसविण्यात आले. तसेच जिल्हा रुग्णालयातही उपकरण बसविण्यात येत आहे. सेंटर फॉर सेल्यूलर ॲड मॉलिक्यूलर प्लॅटफॉर्म (सी-कॅप) येथील इनॲक्सेल टेक्नॉलॉजीने आसाममधील नवजात बालक आणि लहान मुलांच्या श्‍वासासंबंधी उपचार करण्यासाठी मशिन तयार करताना समरिध हेल्थकेअर ब्लेंडेड फायनान्स फॅसिलिटीचे सहकार्य घेतले आहे.

यूनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) च्या सहकार्याने आयपीई ग्लोबलकडून संचलित करण्यात येणारी समरिध ही अनेक गुंतवणूकदार असलेली नवोन्मेष आणि वित्तसंस्था आहे. अधिकाऱ्याने म्हटले की, सान्स उपकरण हे आसामच्या सर्व शिशूंना जीवन प्रदान करणारा श्‍वास उपलब्ध करून देईल. कारण आपल्या मुलांचे आयुष्य बहुमोल आहे. एनएचएम आसाम अभियानाचे संचालक एम.एस. लक्ष्मीप्रिया म्हणाल्या, की सान्स उपकरणाच्या मदतीने आणि सहकार्यातून नवजात शिशूंचा मृत्यदूर हा कमी करणे आणि राज्यात आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात हातभार लागेल.

आणीबाणीच्या वेळी ‘श्‍वास’मिळतो

इनॲक्सेल टेक्नॉलॉजिसचे सह संस्थापक आणि सीईओ सिराज धनानी म्हणाले, की सान्स हे क्रांतिकारी उपकरण आहे आणि त्याने आतापर्यंत भारतात आणि इथोपिया येथे दहा हजार बालकांचे प्राण वाचविले आहेत. या बालकांना आणीबाणीच्या वेळी श्‍वास घेण्याचा आधार मिळाला नसता तर त्यांना आपण गमावून बसलो असतो. दरम्यान, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (आरडीएस) च्या मते, देशात दरवर्षी सुमारे दीड लाख नवजात बालकांचा मृत्यू होता. त्यात एक तृतियांश मृत्यू हे रुग्णालयात नेत असताना होतात. आसाममध्ये एक हजार नवजातांपैकी ४० जणांचा अकाली मृत्यू होतो.

Web Title: Life Giving Device Sans From Startup Company For Newborns Baby Bangalore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..