...म्हणून माझा पराभव झाला : राहुल गांधी 

पीटीआय
बुधवार, 10 जुलै 2019

- अमेठीत झालेल्या पराभवावर राहुल गांधी यांनी दिले स्पष्टीकरण.

अमेठी : कॉंग्रेसचे स्थानिक नेते जनतेपासून दूर राहिल्याने लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. आपण पराभूत जरी झालो असलो, तरी मतदारसंघापासून दूर जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा 50 हजारांहून मतांनी पराभव केला. 

गौरीगंज येथील निर्मलादेवी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट येथे कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अमेठी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी प्रथमच दौऱ्यावर आले. त्यांनी आपल्या पराभवाला स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले. यासंदर्भात कॉंग्रेस नेते नदीम अश्रम जयासी यांनी आढावा बैठकीत राहुल गांधी यांनी मांडलेल्या भूमिकेची माहिती दिली. राहुल म्हणाले, मी अमेठी सोडणार नाही. हे माझे घर आणि कुटुंब आहे. अमेठीच्या विकासकामावर कोणताही परिणाम होणार नाही. मी जरी वायनाडचा खासदार असलो, तरी तीन दशकांपासून अमेठीशी संबंध आहेत. अमेठीसाठी दिल्लीत लढा देईन.

निवडणूक प्रचारात पक्ष कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्धल राहुल गांधी यांनी कौतुक केल्याचे जिल्हा कॉंग्रेस समितीचे सदस्य नरेंद्र मिश्रा यांनी सांगितले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली, मात्र स्थानिक नेते मतदारांपासून दूर राहिल्याने आपला पराभव झाला, अशी खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस जिल्हा समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनीदेखील राहुल गांधी यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला. ते म्हणाले, की निवडणुकीच्या काळात पक्षातील काही मंडळींनी भाजपसाठी काम केले. अमेठीतील कॉंग्रेसची स्थिती खराब असून, प्रचाराला दिशा नव्हती, असेही कार्यकर्त्यांनी नमूद केले.

कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा परत घ्यावा, असा आग्रह त्यांनी राहुल गांधींना केला. या वेळी अमेठीतील कॉंग्रेस नेत्यांनी पराभवाची जबाबदारी घेत राजीनामे दिले. अमेठीत राहुल गांधींचे प्रतिनिधी चंद्रकांत दुबे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनीदेखील राजीनामे दिले. कॉंग्रेसच्या बैठकीनंतर राहुल गांधी हे छटोह ब्लॉकमधील दोन गावांना भेट देण्यासाठी गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local Leader not Connected with Peoples so that I was Defeated says Rahul Gandhi