‘लॉकडाउन-५’चा निर्णय कोणाच्या कोर्टात? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 मे 2020

अमित शाह यांनी या संदर्भात काल सर्व राज्यांची मते आजमावल्यानंतर नरेंद्र मोदींशी चर्चा केली. लॉकडाउनचा पाचवा टप्पा केंद्र लागू करणार की राज्यांवर जबाबदारी सोपविली जाणार याबाबतची घोषणा लवकरच होऊ शकते.

नवी दिल्ली - वाढत्या कोरोना संक्रमणामुळे लॉकडाउन वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भात काल सर्व राज्यांची मते आजमावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. लॉकडाउनचा पाचवा टप्पा केंद्र लागू करणार की राज्यांवर जबाबदारी सोपविली जाणार याबाबतची घोषणा लवकरच होऊ शकते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बहुतांश राज्यांनी लॉकडाउन वाढविण्याची मागणी केल्यानंतर लागू करण्यात आलेला चौथा टप्पा 31 मेस मध्यरात्री समाप्त होणार आहे. मात्र, कोरोना रुग्णवाढीचा वेग अजूनही आटोक्यात आलेला नसून रुग्णसंख्या भरमसाठ वेगाने वाढते आहे. मागील 24 तासांत 7466 नवे रुग्ण देशभरात आढळून आले आहेत. लॉकडाउनमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी केंद्राने पॅकेजची घोषणा करण्याबरोबरच रेड, ग्रीन, ऑरेंज झोनची आखणी करून लॉकडाउनमध्ये सवलती जाहीर केल्या. तसेच बरेचशे निर्णय राज्य सरकारांवर सोपवले. अर्थातच संवेदनशील असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांना यातून वगळले आहे. ताज्या निर्णयामध्ये, सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या 13 जिल्ह्यांमध्ये केंद्राने संबंधित राज्यांना कोरोनाच्या उपद्रवानुसार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक क्षेत्रांची आखणी करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर त्यानंतर लॉकडाउनवर केंद्रातर्फे निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी मात्र गृहमंत्री अमित शाह राज्यांशी बोलणी करण्यासाठी पुढे आले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढविण्याचे आवाहन केंद्राला केल्याचे समजते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यांमधील निर्णय 
दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने लॉकडाउनमध्ये सशर्त सूट दिली असली तरी रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ सरकारसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी अमित शाह यांच्याशी चर्चेदरम्यान मतप्रदर्शन करताना चित्रपट गृहांसारखी गर्दीची ठिकाणे बंदच ठेवावीत अशी सूचना केली आहे. पश्चिम बंगालने आधीच श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांतून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना पसरण्याची चिंता व्यक्त केली होती. तर हरियानासारख्या राज्याने दिल्लीची सीमा सील केली आहे. कोरोना फैलावाच्या मुद्द्यावरच काही राज्यांनी विमान वाहतूक सुरू करण्यावरही आक्षेप घेतला होता. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करण्याची घोषणा करताच महाराष्ट्र, पश्चिम बंगालने प्रारंभी विरोध केल्यानंतर दोन्हीही राज्यांमध्ये विमान वाहतूक सुरू झाली आहे. गृहमंत्री शाह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन राज्यांचे म्हणणे त्यांच्या कानावर घातले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown 5.0 Discussion between Narendra Modi and Amit Shah