Loksabha 2019 : वन मॅन शो; टू मेन आर्मी!

प्रकाश अकोलकर
शुक्रवार, 3 मे 2019

‘अगर सच कहना बगावत है, तो मैं भी बागी हूँ!’ 
पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानासमोरच्या ‘मौर्य’ या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान दालन आणि बिहारच्या या राजधानीतून लोकसभेच्या मैदानात उतरलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची फटाफट डायलॉगबाजी सुरू.

‘अगर सच कहना बगावत है, तो मैं भी बागी हूँ!’ 
पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानासमोरच्या ‘मौर्य’ या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान दालन आणि बिहारच्या या राजधानीतून लोकसभेच्या मैदानात उतरलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची फटाफट डायलॉगबाजी सुरू. गेल्या वेळी त्यांनी हा मतदारसंघ अडीच लाखांच्या मताधिक्‍यानं काबीज केलेला आणि यंदाही त्याच मैदानात ते उभे आहेत. फरक एवढाच की, गेल्या वेळी ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते आणि आता त्यांनी काँग्रेसच्या हातात ‘हात’ दिला आहे. ‘सिच्युएशन कौनसी भी हो, लोकेशन तो वहीं रहेगा...’ असं त्यांनी काँग्रेस प्रवेशाच्या आधीच सांगून टाकलं होतं. तोच डायलॉग ते टाळ्यांच्या कडकडाटात मारतात आणि पुढे बोलू लागतात.

‘बीजेपी तो मेरा परिवार था और इस परिवार में मुझे लाया था भारतरत्न नानाजी देशमुख, श्रद्धेय अटलजी और अडवानीजी ऐसे लोगों ने... पार्टी के दो सदस्य लोकसभा में थे, तबसे मैं परिवार में था... लेकिन अभी लोकशाही तानाशाही में बदल गई है... अहंकार और घमंड की भाषा शुरू है... अटलजी के समय ऐसा नहीं था. अभी ‘आय, मी, मायसेल्फ!’ ऐसा काम शुरू है... तो ये ‘वन मॅन शो; टू मेन आर्मी’का खेल खतम होना चाहिए. कारण, व्यक्ति से बडी पार्टी होती है और पार्टी से बडा देश! ये सच कहना बगावत है तो मैं भी बागी हूँ!’ पुन्हा टाळ्यांचा कडकडाट.

आजच्या नरेंद्र मोदी सरकारचं काम कसं सुरू आहे? पाच केंद्रीय मंत्र्यांची नावे कोणाला सांगता येतील काय? कोई भी एक भी मंत्री को जानता नहीं... जानते हैं तो पहचानते नहीं... पहचानते हैं... तो काम के नहीं हैं... राजनीति में जो कल था, वो आज नहीं हैं... और आज जो है वो कल नहीं रहेगा.

‘शॉटगन’चा फटाफट गोळीबार. अहमदाबादेतील ‘गोध्राकांडा’नंतर गुजरातेत झालेल्या भीषण दंगलींचा उल्लेख न करता, ते पुढे सांगतात : ‘राजधर्मा’च्या प्रश्‍नावरून ज्यांनी पाठराखण केली, ते अडवानी असोत, की मुरलीमनोहर जोशी, अरुण शौरी, यशवंत सिन्हा असोत... त्यांना अडगळीत टाकलंय... तो जाए तो जाए कहाँ?

पण म्हणून काय एकदम काँग्रेस? का नाही? राहुल गांधी आज के तारीख पे ‘ट्राइड, टेस्टेड, सक्‍सेसफूल’ लीडर हैं...  तीन हिंदी भाषिक राज्यं त्यांनी जिंकून दाखवलीत... आणि मग शत्रुघ्नजी एकदम ‘न्याय’, शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प. शिक्षणासाठी साह्य आदी काँग्रेसच्या योजनांचं गुणगान सुरू करतात आणि एकदम वास्तवाकडे येतात : ‘पण त्या विरोधात प्रपोगंडा मशिन जोर से काम कर रहा है... जनशक्‍ति पर धनशक्‍ती का प्रभाव बढ रहा है... ये लढाई जनशक्‍ति विरुद्ध धनशक्‍ती के स्वरूप में है और ऐसा मीडिया में भी शुरू है...’ पुन्हा टाळ्यांचा कडकडाट.

आता प्रश्‍न एवढाच आहे की, ही अशी डायलॉगबाजी त्यांना विजयी करू शकेल का? दहा वर्षांपूर्वी मतदारसंघांच्या फेररचनेनंतर पाटण्याचे दोन मतदारसंघ झाले आणि गुरू गोविंदसिंग यांच्या जन्मामुळे ख्यातकीर्त असलेला हा मतदारसंघ ‘पाटणासाहिब’ या नावानं ओळखला जाऊ लागला. येथे सिन्हा साहेबांपुढे भाजपनं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचाही प्रचार जोरात आहे. नितीशकुमार यांची सारी फौज त्यांच्या दिमतीला आहे. शत्रुघ्न सिन्हा आणि रविशंकर प्रसाद दोघेही ‘लाला’ म्हणजेच कायस्थ. त्यामुळे जातीपातींच्या राजकारणाचा बुजबुजाट असलेल्या बिहारमध्ये ही मतं या दोघांत विभागली जाणार. मात्र, शत्रुघ्न ‘गठबंधना’चे उमेदवार आहेत. त्यामुळेच यादव, मुस्लिम, निषाद इत्यादी समाजही आपल्यालाच मतदान करेल, अशी त्यांना आशा आहे.
आता या लढतीत पडद्यावरील एकेकाळचा हा ‘व्हीलन’ वास्तवात ‘हीरो’ ठरतो काय ते बघायचं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Patna Constituency Article Prakash Akolkar