Loksabha Election 2024 : भाजपची १४४ जागांसाठी खलबते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha Election 2024 BJP fighting for 144 seats amit shah JP nadda

Loksabha Election 2024 : भाजपची १४४ जागांसाठी खलबते

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकांबरोबरच २०२४ लोकसभा रणधुमाळीच्या तयारीला जोरदार सुरवात केलेल्या भारतीय जनता पक्षाने मंगळवारी संध्याकाळी एका उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय मंत्र्यांकडून पक्षसंघटनेच्या कामाचा अहवाल घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व संघाचे भाजपमधील प्रतिनिधी बी. एल. संतोष यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ही दीर्घ बैठक झाली. त्यात १४४ जागांवरील पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला, ज्या जागांवर २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजप दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर राहिला होता. साडेसहा वाजण्याच्या आसपास सुरू होऊन जवळपास मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या बैठकीत या व्यतिरिक्त झालेल्या चर्चेची विशेषतः शहा यांच्या ‘संबोधना‘ची माहिती देण्यास पक्षसूत्रांनी असमर्थता दर्शविली.

या १४४ जागा वरिष्ठ मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या गटांमध्ये विभागल्या होत्या. धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, नरेंद्र तोमर, स्मृती इराणी, संजीव बल्यान, महेंद्र पांडे आदी सुमारे १५ प्रमुख मंत्र्यांकडे या गटांची जबाबदारी देण्यात आली होती. रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळापाठोपाठ या गटातूनही वगळण्यात आले होते असे समजते. त्या त्या मतदारसंघांतील पदाधिकारी व बूथ प्रभारींनी दाखल केलेल्या अहवालानुसार या जागांच्या ‘ग्राउंड झीरो‘ स्थितीचा अभ्यास केला गेला. हे अहवाल तयार करण्यासाठी संबंधित मंत्र्यांना ३१ ऑगस्टची मुदत देण्यात आला होता. मोदी-शहा अंतिम शिक्कामोर्तब करतील अशा २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या ‘रोडमॅप'' बाबतही या बैठकीत प्राथमिक माहिती देण्यात आल्याचे समजते. शहा आणि नड्डा यांनी पक्षाच्या सर्वेसर्वा नेतृत्वाच्या आदेशानुसार या १४४ जागांना धावती किंवा सविस्तर भेट गेल्या काही काळात दिली, ज्यात मुंबईतील शिवसेनेकडच्या जागांचाही समावेश होता. भाजपने याचे सर्वेक्षण केले आणि गमावलेल्या जागा जिंकण्यासाठी पावले उचलण्याची सूचना करणारा अहवाल तयार केला. त्यावरही बैठकीत दीर्घ चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनाही बोलावणार

भाजपने २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस व अन्य उपमुख्यमंत्र्यांना पुढील आठवड्यात दिल्लीला बोलावले आहे. पंतप्रधान मोदी आणि शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक होणार आहे. यात भाजपच्या राज्यनिहाय तयारीचा आढावा घेतला जाईल. विशेषतः गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभूत झालेल्या या बैठकीतही ‘त्या‘ १४४ लोकसभा जागा जिंकण्यासाठीची चर्चा प्राधान्याने होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.