

New Bismuth-Based Drug Formula for Lung Cancer Treatment
esakal
उत्तर प्रदेश : फुफ्फुसाच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये औषधांचे दुष्परिणाम कमी करण्याच्या दिशेने लखनौ विद्यापीठातील संशोधकांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. ओम प्रकाश यांनी प्लॅटिनमऐवजी बिस्मथ या धातूचा वापर करून औषधाचा नवा फॉर्म्युला विकसित केला आहे. या संशोधनाला पेटंट मिळाले असून, त्यासंबंधीचा शोधनिबंध 'जर्नल ऑफ इनऑर्गॅनिक बायोकेमिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. प्रयोगशाळेतील प्राथमिक चाचण्यांमध्ये या फॉर्म्युलाने कर्करोगाच्या पेशींवर सकारात्मक परिणाम दाखवला आहे. आता पुढील टप्प्यात प्राण्यांवर चाचण्या करण्याची तयारी सुरू आहे.