भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे मुंबईत निधन; PM मोदींवर लिहिलं होतं पुस्तक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

मध्य प्रदेशातील  भाजपचे वरिष्ठ नेते कैलास सारंग यांचे शनिवारी मुंबईमध्ये निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

भोपाळ - मध्य प्रदेशातील  भाजपचे वरिष्ठ नेते कैलास सारंग यांचे शनिवारी मुंबईमध्ये निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. सारंग यांच्या निधनानंतर मध्य प्रदेश भाजपसह अनेक नेत्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. 

जनसंघाची मध्य प्रदेशात उभारणी करण्यामध्ये कैलास सारंग यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. अटल बिहारी वाजपेयी आणि विजयाराजे सिंधिया यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं. भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या कैलास सारंग यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीविरोधात आवाज उठवला होता. यासाठी त्यांना काही महिन्यांचा तुरुंगवासही झाला होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर कैलास सारंग यांनी एक पुस्तकही लिहिलं होतं. त्यामध्ये नरेंद्र मोदींच्या संघर्षांच्या दिवसांपासून देशाचे नेतृत्व करण्यापर्यंतचा प्रवास लिहिला आहे. यात मोदींच्या आयुष्यातील चढ उतार यांचा उल्लेख आहे. नरेंद्र से नरेंद्र असं या पुस्तकाचं नाव आहे. 

गेल्या वर्षी कैलास सारंग यांच्या आयुष्यावर एक प्रेरणादायी चित्रपट तयार करण्याच निर्णय घेण्यात आला होता. यामाध्यमातून राजकीय आणि सामाजिक कार्य मांडण्यात येणार असून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असं दिग्दर्शकाने सांगितलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh bjp leader kailash sarang passes away