इतर राज्यातून शेतमाल विकायला आलेल्यांना तुरुंगात टाकू- शिवराजसिंह चौहान

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 3 December 2020

आजूबाजूच्या राज्यातून येऊन येथे कोणी माल विकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा ट्रक जप्त करण्यात येईल आणि संबंधितांना अटक करण्यात येईल, असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत.

भोपाळ- मी निर्णय घेतला आहे की राज्यात शेतकरी जितके उत्पादन घेतील, तितका माल विकत घेतला जाईल. पण, अन्य राज्यातून कोणी येथे आपला शेतमाल विकायला आला, आजूबाजूच्या राज्यातून येऊन येथे कोणी माल विकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा ट्रक जप्त करण्यात येईल आणि संबंधितांना अटक करण्यात येईल, असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत. ''एएनआय' या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 
 

काँग्रेसने कायमच शेतकऱ्यांचा विरोध केला आहे. काँग्रेस गोंधळाचा फायदा घेऊ पाहात आहे. काँग्रेसने निमुच आणि मंदसोरमध्ये वातावरण खराब केले होते. काँग्रेसला आम्ही मध्य प्रदेशात असं काहीही करु देणार नाही, असंही चौहान म्हणाले आहेत. ते सेहोर येथील सभेत बोलत होते. 

 

दरम्यान, सरकारच्या महत्वाकांक्षी 'एक देश एक बाजार '  (one nation one market ) या संकल्पनेला मुर्त रूप देण्यासाठी नवे कृषी कायदे आणण्यात आले आहेत. यामुळे देशातील कोणताही शेतकरी आपला शेतमाल स्थानिक बाजार समितीबरोबर तिच्या बाहेर देशभरात कोठेही विकु शकतो. पण,  मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बाहेरील राज्यातून आलेल्यांना मध्य प्रदेशात शेतमाल विकू देणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे धोरण आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या धोरणात विरोधाभास दिसून येत आहे. 

काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने दोन नवीन कृषी कायदे व अगोदरच्या एका कायद्यामध्ये दुरुस्ती करून असे तीन नवीन कृषी विधेयके पारित केली होती. या नव्या कृषी सुधारणांमुळे शेतकरी बंधनमुक्त होतील आणि त्यांना देशभरात कोठेही आपला शेतमाल विकता येईल, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. पण, नवीन कृषी कायदे कॉर्पोरेट मालकांचे हित जपणारे आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पंजाब, हरियाणासह अन्य राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. तसेच देशभरातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आक्रमक होताना दिसत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh cm shivraj singh chouhan said about farmers