मधमाशांसारखा आवाज काढून हत्तींना पळविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhya Pradesh elephants

मधमाशांसारखा आवाज काढून हत्तींना पळविणार

भोपाळ : विविध कारणांमुळे बिबट्या, हत्ती, वाघ आदी वन्यप्राण्यांशी मनुष्याचा संघर्ष वाढत आहे. मध्य प्रदेशातील गावांत हत्तींपासून होणारा त्रास रोखण्यासाठी गावकऱ्यांना मधमाशीसारखा आवाज काढायला शिकविले जाणार आहे. त्याचप्रमाणे, हत्तींना पळवून लावण्यासाठी तिखट घातलेली गोवरी जाळण्यासारखे तंत्रही शिकविले जाईल, अशी माहिती मध्य प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक जे.एस.चौहान यांनी दिली. हत्तीसारख्या वन्य प्राण्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी सौर कुंपणही उभारले जाणार आहे.

शेजारच्या छत्तीसगडमधून हिंसक टस्कर मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशात प्रवेश करतात. या टस्करांमुळे मोठी जीवित व पीकहानी होते. ती रोखण्यासाठी राज्याच्या वन खात्याने स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) मदत घेतली आहे. हे एनजीओ हत्तींना पळविण्याच्या अनोख्या युक्त्यांबाबत गावकऱ्यांमध्ये जागृती करतील. वनसंरक्षक चौहान याबाबत म्हणाले, की हत्तींवर दगडफेक केल्याने किंवा त्यांच्यासमोर गेल्याने ते चिडू शकतात.

त्यामुळे, अशी कृती करू नका, असे आम्ही गावकऱ्यांना सांगणार आहोत. वन खाते गावकऱ्यांना मधमाशीसारखा आवाज काढणे, तिखट घातलेली गोवरी जाळण्याचे तंत्र शिकवेल. मनुष्य-हत्तींमधील संघर्ष रोखण्यासाठी ‘हाथी मित्र दला’चीही स्थापना केली जाईल. छत्तीसगडमधून ज्या ठिकाणी हत्ती मध्य प्रदेशात प्रवेश करतात, तेथील आघाडीवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची पहिली फेरीही पूर्ण झाली आहे. हत्तींच्या २०१७ मध्ये केलेल्या गणनेनुसार मध्य प्रदेशात अवघे सात हत्ती होते.

मात्र, आता हत्तींची संख्या ६० वर गेली आहे. यापैकी ५० हत्ती छत्तीसगडमधून आले असून ते मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थायिक झाले आहेत. तर उर्वरित हत्ती संजय दुब्री व्याघ्र प्रकल्पात आहेत, असेही त्यांनी नमूद केले. हत्तींचा छत्तीसगडमधील अधिवास संकुचित होत असल्याने ते मध्य प्रदेशात प्रवेश करत आहेत. वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांच्या म्हणण्यानुसार मध्य प्रदेशात यावर्षी हत्तींच्या हल्ल्यात आठजणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकारी आकडेवारीनुसार केवळ तिघांनीच हत्तींच्या हल्ल्यात प्राण गमावले आहेत. त्या शाहडोल जिल्ह्यामधील दोन व मांडला जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.

हत्तीच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील कोहका गावात हत्तीच्या हल्ल्यात पासष्टवर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. शेतात काम करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हत्तीने हल्ला केला. या घटनेनंतर वन विभागाने वृद्धाच्या नातेवाइकांना तत्काळ २५ हजारांची मदत दिली. उर्वरित नुकसानभरपाईही लवकरच दिली जाणार आहे.

रणथंबोरमधून दोन वाघ मुकुंद्रा, सरिस्काला

राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातून मुकुंद्रा आणि सरिस्का अभयारण्यात दोन वाघांचे स्थलांतर करण्यास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. केंद्र सरकारने आणखी एक मंजुरी दिल्यानंतर या वाघांचे स्थलांतर केले जाईल. याबाबत राजस्थानच्या वनविभागाने तांत्रिक समितीला प्रस्ताव दिला होता. एका वाघाचे सारिस्का तर दुसऱ्याचे मुकुंद्रात स्थलांतर करण्यात येईल. दरम्यान, बिहारमध्ये नऊ जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला नुकतेच वन्यजीव विभागाच्या आदेशानुसार ठार करण्यात आले.

आपण हत्तींसोबत जगायला शिकायला हवे. या वन्य प्राण्याबद्दल थोडेसे समजून घेऊन आणि संयम पाळल्यास आपण मानवी जीवन आणि मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळू शकतो. प्रखर प्रकाश, फटाके उडविणे, मधमाशांसारखा आवाज काढणे तसेच तिखट घातलेली गोवरी जाळून हत्तींना पळवून लावता येऊ शकते.

- जे.एस.चौहान, प्रधान मुख्य वनसंरक्षक, मध्य प्रदेश