मध्यप्रदेशातील सेक्स रॅकेटचे मराठवाड्यातील मोठ्या नेत्यांशी कनेक्शन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 September 2019

मध्यप्रदेशातील हायप्रोफाईल खंडणी रॅकेटमध्ये बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आठ माजी मंत्री अडकल्याने याची व्याप्ती आणखी वाढली आहे, या खंडणी रॅकेटमधील अश्‍लील संभाषणाच्या एक हजार क्‍लिप्स, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि काही ऑडिओ क्‍लिप्स विविध संगणक आणि मोबाईलमध्ये आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

भोपाळ : मध्यप्रदेशातील हायप्रोफाईल खंडणी रॅकेटमध्ये बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आठ माजी मंत्री अडकल्याने याची व्याप्ती आणखी वाढली आहे, या खंडणी रॅकेटमधील अश्‍लील संभाषणाच्या एक हजार क्‍लिप्स, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि काही ऑडिओ क्‍लिप्स विविध संगणक आणि मोबाईलमध्ये आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. बडे राजकीय नेते, कुबेरांना गळाला लावण्यासाठी हा मोठा हनी ट्रॅप आखण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

या हनीट्रॅपच्या सूत्रधार या पाच महिला असून त्यांनी सेक्‍स वर्कर आणि कॉलेजमधील मुलींच्या माध्यमातून बड्या मंडळींना ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या या हनीट्रॅपचा तपास विशेष तपास पथकाच्या माध्यमातून केला जात आहे.

पोलिसांनी विविध ठिकाणांवर छापे घातल्यानंतर काही दस्तावेज त्यांच्या हाती लागले असून या रॅकेटचा विस्तार मध्यप्रदेशच्याही बाहेर आहे. या रॅकेटचा तपास करणारे विशेष तपास पथकाचे प्रमुख संजीव शामी म्हणाले की, या प्रकरणातील आरोपींना काही विशिष्ट गोष्टींच्या मोबदल्यात फायदा मिळवून दिल्याप्रकरणी दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच ज्यांच्या क्‍लिप्स हाती लागल्या आहेत त्यांच्यात भाजप आणि कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे.'' 

महिलांना अटक 
पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी पाच महिलांना अटक केली असून श्‍वेता जैन (वय 39), बरखा सोनी (वय 35), आरती दयाळ (वय 34) अशी या महिलांची नावे आहेत, याप्रकरणी आरती दयाळच्या चालकासही अटक करण्यात आली आहे. बरखा सोनी या कॉंग्रेसच्या आयटीसेलचे माजी अधिकारी अमित सोनी यांच्या पत्नी होत. 

बड्या नेत्यांशी कनेक्‍शन 
श्‍वेता जैन या एक स्वयंसेवी संस्था चालवितात तसेच भाजप आमदार ब्रिजेंद्रप्रताप सिंह यांची घरे भाड्याने देण्याचे कामही त्या करत असत. श्‍वेता यांचे महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील काही बड्या नेत्यांशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. मध्यप्रदेशातील एका माजी मंत्र्याच्या माध्यमातून त्यांनी अन्य नेत्यांना गळाला लावले होते. 

जैन यांची कबुली 
बडे अधिकारी आणि राजकीय नेत्यांना गळाला लावण्यासाठी 24 पेक्षाही अधिक मुलींचा वापर करण्यात आला होता, या सर्व मुली या मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या अशी कबुली जैन यांनी चौकशीदरम्यान दिली आहे. अनेक मुलींना अलिशान जीवनशैली आणि महागड्या गाड्यांचे आमिष दाखवून त्यांना वाम मार्गाला लावल्याची कबुलीही जैन यांनी पोलिसांना दिली आहे. 

प्रत्येकीची स्वतंत्र टोळी 
या खंडणी रॅकेटमधील प्रत्येक महिलेची स्वतंत्र अशी टोळी होती, मध्यंतरी याच टोळीने एका आयएएस अधिकाऱ्याकडे दोन कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली होती. इंदूर महापालिकेतील एका अधिकाऱ्याने आरती दयाळ या महिलेविरोधात तीन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार नोंदविल्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला. 

अभिनेत्रींचा सहभाग 
या हनीट्रॅपमध्ये बॉलीवूडच्या अभिनेत्रींचाही सहभाग असल्याचे उघड झाले असून मासा गळाला लागल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला मद्य पाजून त्याचे अश्‍लील चित्रण करत असत आणि नंतर याच आधारे संबंधित नेत्याला ब्लॅकमेल करण्याचा उद्योग त्यांच्याकडून केला जात असे. या महिलांकडून हॉटेलांतील वास्तव्यासाठी बनावट ओळख पत्राचा वापर केला जात होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya Pradesh honey trap blackmail scandal connection with Marathwada political leaders